जेरुसलेम : वृत्तसंस्था
मध्यपूर्वेत इस्रायल आणि हिजबुल्लाह यांच्यात सुरू असलेला संघर्ष संपुष्टात येण्याच्या दिशेने वाटचाल सुरु आहे. इस्रायलच्या संरक्षण मंत्रिमंडळाने इराण समर्थित हिजबुल्लाहसोबतच्या युद्धविराम कराराला मंजुरी दिली असून, लेबनॉनमध्ये अनेक महिन्यांपासून सुरू असलेला हिंसाचार संपुष्टात आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
इस्रायल आणि हिजबुल्लाह अमेरिका आणि फ्रान्स यांच्या मध्यस्थीने युद्धविरामाला सहमती दर्शवली, याबाबत दोन्ही नेते लवकरच जाहीर करणार आहेत. यानंतर इस्रायली सैनिक दक्षिण लेबनॉनमधून परततील. लेबनीज सैन्य या भागात ५,००० सैन्य तैनात करेल.
इस्रायल आणि लेबनॉनमधील युद्धात लेबनॉनमध्ये आतापर्यंत सुमारे ३,८०० जणांचा मृत्यू झाला आहे. तर १६,००० हून अधिक जखमी झाले आहेत. इस्त्रायली हल्ल्यांमुळे लेबनॉनच्या पायाभूत सुविधांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मात्र, अमेरिकेने मदत करण्याचे सांगितले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी या कराराला मध्यपूर्वेसाठी सकारात्मक पाऊल म्हटले आहे. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनीही या निर्णयाचे कौतुक केले आहे.
युद्धबंदीची घोषणा झाल्यानंतर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी देशाला संबोधित केले, पण कोणत्याही उल्लंघनास कठोर प्रत्युत्तर दिले जाईल, असं ते म्हणाले आहेत. यामध्ये गाझाकडून धोका संपुष्टात आणणे आणि ओलिसांचे सुरक्षित परत येणे याचा समावेश आहे.