ईडी कार्यालयांसमोर आंदोलन, कार्यकर्त्यांची धरपकड
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
काँग्रेस नेते राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्यासह त्यांच्या कौटुंबिक सदस्यांवर ईडीने नॅशनल हेराल्ड मनी लॉन्ड्रिंग केसमध्ये आरोपपत्र दाखल केले. कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून याचा निषेध केला. यासाठी देशव्यापी आंदोलन करण्यात आले. देशात जिथे ईडीची कार्यालये आहेत, तेथे आंदोलन करण्यात आले. काँग्रेस पक्षाने या संदर्भात सर्व प्रदेश काँग्रेस समितीसाठी सर्क्युरल जारी करीत आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार ठिकठिकाणी कॉंग्रेस नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते.
काँग्रेसच्या प्रदेश समितींनी आपापल्या राज्यातील ईडी (सक्तवसुली संचालयाच्या) कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांना जमवून निदर्शने करण्याचे आदेश देण्यात आले होते. काँग्रेसला राजकीय हेतूने निशाणा बनवले जात असून याचा पक्ष मोठ्या धैर्याने सामना करण्यास तयार असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. नॅशनल हेराल्ड मनी लॉन्ड्रींग केसमध्ये ईडीने काँग्रेसचे खासदार राहुल गांधी, सोनिया गांधी आणि काँग्रेसच्या ओव्हरसिज प्रमुख सॅम पित्रोदा यांच्या विरोधात दिल्लीच्या राऊज एव्हेन्यू कोर्टात प्रॉसिक्युशन कम्प्लेंट (चार्जशिट) दाखल केली आहे. ईडीने या प्रकरणात आरोपपत्रात सुमन दुबे आणि अन्य लोकांची नावेही घातली आहेत. त्यावरून कॉंग्रेस नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.
या प्रकरणात आधीच ईडीने ६४ कोटी रुपयांहून अधिकची संपत्ती जप्त केली आहे. ईडीद्वारा राहुल गांधी, सोनिया गांधी आणि अन्य लोकांच्या विरोधात पीएमएलएच्या कलम ४४ आणि ४५ अंतर्गत तक्रार दाखल केली होती. त्यात आरोपींनी कलम ३ नुसार मनी लॉड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे. तक्रार आणि संबंधित कागदपत्रांची चांगल्या प्रतीची कॉपी आणि ओसीआर (रीडेबल) प्रत पुढच्या सुनावणीच्या आधी दाखल करावी, असे म्हटले आहे.
मुंबईत खा. गायकवाड
झटापटीत जखमी
मुंबईतील ईडी कार्यालयाबाहेरही आज जोरदार आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाच्या वेळी पोलिस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाली. या झटापटीत काँग्रसच्या खासदार वर्षा गायकवाड जखमी झाल्या. त्यांना तातडीने जी. टी. रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे वर्षा गायकवाड यांच्यावर उपचार करण्यात आले.