देवणी : बाळू तिपराळे
निसर्गाच्या अवकृपेने शेतीचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले असताना कर्जाची परतफेड करायची कशी, असा प्रश्न दुष्काळग्रस्त शेतक-यांना सतावत आहे. खरीप हंगामात पिकांवर केलेला खर्चही वसूल झाला नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. अशा परिस्थितीत कर्जवसुलीचा तगादा थांबवून व्याजमाफी द्यावी, तसेच शेतकरी आणि शेतमजुरांना आर्थिक दिलासा द्यावा, अशी मागणी जोर धरत आहे.
देवणी तालुक्यातील भीषण दुष्काळामुळे शेतीच्या उत्पन्नावर मोठा परिणाम झाला आहे. पिके हातची गेल्याने अनेक शेतक-यांसमोर कर्जाचे हप्ते भरण्याचे संकट उभे राहिले आहे. सरकारने सक्तीच्या कर्जवसुलीबाबत कडक कारवाई करण्याची घोषणा केली असली, तरी प्रत्यक्षात शेतक-यांना दिलासा मिळण्यासाठी ठोस निर्णय आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी आवश्यक आहे. केवळ घोषणांनी कर्जाचा विळखा सुटणार का, असा सवाल उपस्थित होत आहे.
















