लातूर : प्रतिनिधी
वर्षानुवर्षे भक्तांच्या मस्तकावर कृपेचा हात ठेवलेल्या बाप्पांसाठी सर्वत्र सध्या धामधूम सुरू आहे. ६४ कलांचे आराध्य दैवत म्हणून प्रत्येक शुभकार्याप्रसंगी त्यांची आठवण ही ठरलेलीच असते. बाप्पांचा हा जागर सुरू असल्यामुळे जिल्हाभरात वातावरण भरून आले आहे. विघ्नहर्ता गणेश, सुखकर्ता गणेश, दु:खहारी गणेश म्हणून बाप्पांच्या गुणांचे गोडवे गाताना भक्तगण दिसत आहेत. मात्र आता पारंपरिक गणेशोत्सवात अमूलाग्र बदल झाला असून गणेशोत्सवाचा नवीन ‘लुक’ पहावयास मिळू लागला आहे. असे असले तरी भक्तीचा महिमा काही कमी झाला नसल्याचेच चित्र दिसून येत आहे. उत्सवाचा बाज काळानुरूप बदलू लागला असून विधायकतेलाही नवा साज मिळत आहे.
झांज-टाळाच्या साथीने म्हटल्या जाणा-या आरत्या, रात्रभर जागून महिलांचा जागर, घागरी फुंकून, झिम्मा फुगड्या खेळत जागबली जाणारी रात्र मागे पडली आहे. डी. जे. च्या दणदणाटाने ग्रामीण बाज, पारंपरिक कार्यक्रमांची रेलचेल नाहीशी होऊ लागली आहे. ग्रामीण भागात घरादारांची रंगरंगोटी, नव्या वस्तूंची खरेदी, गणेशाच्या आरासासाठी सजावटीची लगबग असे उत्साहवर्धक वातावरण पहायला मिळायचे. ग्रामीण भागात तसा उत्साह असायचा.
गणपतीची तयारी करताना घराघरात चांदल उडायची. घरादाराला रंगरंगोटी, लाल रंगाच्या कावाने भिंती रंगवल्या जायच्या, त्यावर रंगवलेले वेल यामुळे वर्षभराचा मळलेला रंग उजळून निघायचा. आरासीची तयारी मोठ्या जोमाने केली जायची, रानावनात फुललेली विविध प्रकारची मनमोहक फुले, नाजूक पानाचा हिरवागार शेवरा, मोहक रंगाचा फुलोरा, विविध प्रकारची, आकाराची पानं, फळे गोळा केली जायची, आता उत्सवाचे स्वरूप बदलले असून पारंपरिकतेची जागा आधुनिक उत्सवाने कृत्रीम सजावटीने घेतली आहे.
काही वर्षांपूर्वी ग्रामीण भागात दिसणारे अगदी पारंपरिक गणेशोत्सवाचे चित्र बदलत्या काळानुसार पूर्णपणे बदलून गेले आहे. वाढते शहरीकरण ग्रामीण भागातही शिरू लागले आहे. त्यामुळे गणेशोत्सास वेगळा ‘लुक’ मिळू लागला आहे. पूर्वी कारागीर, मूर्तीकारांनी कुंभारवाडे बहरून जायचे. आता मात्र तयार गणेशमूर्तीमुळे हे सर्व चित्र पूर्णपणे बदलून गेले आहे. पावलोपावली गणेशमूर्तीचे स्टॉल लक्ष वेधून घेत आहेत. अनेक फिरस्त्या विक्रेत्यांनी ग्रामीण भागातील मार्केट आपल्या ताब्यात घेतले आहे. बुंदी असतानाही वजनाने हलक्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती वाजवी किमतीत मिळत असल्याने भविष्यात ग्रामीण कारागिरांच्या हाताला काम मिळते की नाही हाच खरा प्रश्न आहे.
लोकमान्य टिळकांनी लोकजागृतीसाठी घरगुती गणेशोत्सवाला सार्वजनिक स्वरूप दिले. त्याकाळी गणेशोत्सवाच्या निमित्ताने लोकांनी एकत्र यावे, त्यांच्यात संवादातून प्रबोधन घडावे, असा हेतू होता, मात्र, काळानुरूप उत्सव बदलू लागला आहे. शहरात व ग्रामीण भागात प्रत्येक गल्लीच्या कोप-यात मंडळे स्थापन झाल्याने गणेशोत्सव गल्लीपुरताच मर्यादित झाला आहे. गणेशोत्सवाद्वारे एकात्मता, समाजप्रबोधनपर कार्यक्रम, व्याख्यानमाला, चर्चासत्रे आदी कार्यकम आयोजित करण्यावर भर देणे आवश्यक आहे.