22.7 C
Latur
Saturday, July 27, 2024
Homeमहाराष्ट्रउदयनराजेंना ‘घड्याळा’ची ऑफर पण राजे ‘कमळा’वरच ठाम!

उदयनराजेंना ‘घड्याळा’ची ऑफर पण राजे ‘कमळा’वरच ठाम!

सातारा : प्रतिनिधी
महायुतीत सातारा लोकसभा मतदारसंघाची जागा भाजप आणि राष्ट्रवादीसाठी डोकेदुखी ठरत आहे. महायुतीकडून साता-यात उदयनराजे भोसले यांना उमेदवारी देण्यावर एकमत झाले आहे. मात्र, महायुतीत ही जागा राष्ट्रवादीकडेच राहणार असल्याच्या भूमिकेवर अजित पवार ठाम आहेत. त्यामुळे उदयनराजेंनी राष्ट्रवादी पक्षाच्या घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवावी असा प्रस्ताव अजित पवारांनी दिला आहे. मात्र, उदयनराजे हे भाजपच्या कमळावरच निवडणूक लढवण्याच्या भूमिकेवर ठाम आहेत. त्यामुळे महायुतीत सातारा लोकसभा मतदारसंघाचा तिढा सुटता सुटत नसल्याचे चित्र आहे.

सातारा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी उदयनराजे भोसले इच्छुक आहेत. मात्र, भाजपकडून आतापर्यंत जाहीर करण्यात आलेल्या यादीत त्यांचे नाव नसल्याने त्यांनी थेट दिल्ली गाठली आहे. मागील तीन दिवसांपासून दिल्लीत ठाण मांडून असलेल्या उदयनराजे भोसले यांनी काल रात्री अमित शहा यांची भेट घेतली. त्यामुळे आता अमित शहा यावर काय तोडगा काढणार हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे. मात्र, अजित पवार गट साता-याची जागा सोडण्यासाठी तयार नाही.

सातारा लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजला जातो. त्यामुळे महायुतीत देखील या जागेवर राष्ट्रवादीकडून दावा केला गेला आहे. अशात उदयनराजे भोसले भाजपकडून या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. पण, अजित पवारांकडून या मतदारसंघावर दावा करण्यात आल्याने भाजपची कोंडी झाली आहे. अशात उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव अजित पवारांकडून देण्यात आला आहे. पण, कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रवादी हा मतदारसंघ सोडणार नसल्याची भूमिका अजित पवार गटाची आहे.

उदयनराजे भोसले कमळावरच ठाम…
सातारा लोकसभा मतदारसंघात महायुतीचा उमेदवार निश्चित झाला आहे, पण कोणत्या पक्षाकडून लढणार यावर निर्णय होत नसल्याचे चित्र आहे. उदयनराजे भोसले जर येथून निवडणूक लढवणार असतील, तर त्यांनी राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवली पाहिजे अशी भूमिका अजित पवार गटाची आहे. मात्र, कोणत्याही परिस्थितीत सातारा लोकसभा मतदारसंघाची जागा ही भाजपनेच लढवावी यावर उदयनराजेही ठाम आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR