ही केवळ सदिच्छा भेट असल्याचा खुलासा
मुंबई : प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीला मोठा विजय मिळाला. त्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी मुंबई येथे पार पडला. या शपथविधीसाठी उद्धव ठाकरेंसह विरोधी पक्षांतील नेत्यांना निमंत्रण दिले. परंतु अनेकजण शपथविधीला हजर राहिले नाहीत. दरम्यान, आज उद्धव ठाकरे यांनी नागपूरच्या विधीमंडळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीवरून आता राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. मात्र ही सदिच्छा भेट असल्याचे बोलले जात आहे.
यावेळी आदित्य ठाकरे, भास्कर जाधव, सचिन अहिर आणि वरुण सरदेसाई उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथविधी सोहळ््याला उपस्थित राहण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना फोन करून निमंत्रण दिले होते. मात्र विरोधकांमधून कुणीही यावेळी उपस्थित राहिले नाही. याबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी शपथविधीनंतरच्या पत्रकार परिषदेत भाष्य केले होते. यानंतर आज हिवाळी अधिवेशनाच्या दुस-या दिवशी उद्धव ठाकरे यांनी अनिल परब, आदित्य ठाकरे, वरूण सरदेसाई आणि सचिन अहिर यांच्यासह मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यामध्ये १० ते १५ मिनिटे चर्चा झाली. त्यानंतर त्यांनी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचीही भेट घेतली.
ही भेट सहज होती
ही भेट नियोजित नव्हती तर सहज घेतलेली होती असं सचिन अहिर यांनी सांगितलं. राज्याच्या विरोधी पक्षनेतेपदावर यावेळी काही चर्चा झाली नाही, असे आमदार सचिन अहिर म्हणाले.