19.1 C
Latur
Thursday, January 2, 2025
Homeमहाराष्ट्रउद्धव ठाकरे बीड, परभणी दौरा करणार

उद्धव ठाकरे बीड, परभणी दौरा करणार

मुंबई : बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली. या हत्येला १९ दिवस उलटले तरी आरोपी पोलिसांच्या ताब्यात नाही. या हत्येप्रकरणी राज्यातील विरोधकांनी बीडमधील वाल्मिक कराड याला अटक करण्याची मागणी केली आहे. त्या पार्श्वभूमीवर आज (२८ डिसेंबर) बीडमध्ये सर्वपक्षीय मूक मोर्चा काढण्यात आला असून विरोधक एकवटले आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे बीड आणि परभणी दौरा करणार आहेत. या दौ-यात उद्धव ठाकरे सोमनाथ सूर्यवंशी आणि संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांना भेट देणार असल्याची माहिती समोर येत आहे.

सद्यस्थितीत बीड जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले आहे. संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी मूक मोर्चा काढला. या मोर्चात अनेकजण सहभागी झाले आहेत. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगेंपासून ते अंजली दमानिया यांच्यापर्यंत अनेक जण बीडमध्ये भेटी देत आहेत. अशात जानेवारीमध्ये पहिल्या आठवड्यात शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे हे परभणी आणि बीड येथे जाऊन सोमनाथ सूर्यवंशी आणि संतोष देशमुख यांच्या कुटुंबाची भेट घेतील, अशी माहिती शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिली.

खरे गुन्हेगार मंत्रिमंडळात आणि सरकारमध्ये आहेत, अशी लोकांची भावना आहे. या मोर्चामध्ये अनेक मोठे नेते सहभागी होतील. शिवसेनेतर्फे आमचे संभाजीनगरचे सगळे प्रमुख नेते आहेत. ते यात सहभागी होतील. तसेच बीडमधील मोर्चा झाला. बीडमधील दहशतवाद संपवण्यासाठी किंवा संतोष देशमुखचे खरे आरोपी पकडावे आणि त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळावा म्हणून हा मोर्चा आहे. हे सरकार ख-या गुन्हेगारांना वाचवत आहे , असे म्हणत संजय राऊत यांनी सरकारवर निशाणा साधला.

त्याचप्रमाणे, भाजपचे अ‍ॅक्शन मोड म्हणजे काय तर, ईव्हीएम ताब्यात घेणे, पैसे जमा करणे, पैसे कुठे वाटत आहे ते पाहणे ही त्यांची अ‍ॅक्शन मोड असते. मुंबई महानगरपालिका निवडणूक असेल, विधानसभेच्या निवडणुका असतील, लोकसभेच्या निवडणुका असतील, आमची ताकद आमचा कार्यकर्ता आहे. कार्यकर्त्यांना विकत घेणारी नवी जमात जर राजकारणात, महाराष्ट्रात वाढत असेल, तर नुकसान महाराष्ट्राचे आहे आणि संपूर्ण आपल्या मराठी अस्मितेचे आहे, अशीही टीका संजय राऊत यांनी केली.

दरम्यान, सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण, हत्या आणि मस्साजोगशी संबंधित सर्व गुन्ह्यांचा तपास सीआयडीकडे वर्ग करण्यात आला आहे. या घटनेतील संशयित फरार आरोपी वाल्मिक कराड याचा सीआयडी आणि पोलिसांकडून शोध सुरू आहे. पण वाल्मिक कराड अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. यानंतर आता सीआयडी चांगल्याच अ‍ॅक्शन मोडमध्ये आली आहे. सीआयडीने आज वाल्मिक कराड यांच्या पत्नी मंजिरी कराड यांना चौकशीसाठी बोलावले. त्यांची कसून चौकशी करण्यात आली आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांची देखील सीयआडीकडून चौकशी सुरू असल्याची माहिती मिळत आहे. याशिवाय वाल्मिक कराड यांच्या दोन अंगरक्षकांची देखील सीआयडीकडून चौकशी सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR