29.8 C
Latur
Friday, April 11, 2025
Homeमहाराष्ट्रउद्योगपतींना जमिनी देण्याचे भाजपचे षड्यंत्र

उद्योगपतींना जमिनी देण्याचे भाजपचे षड्यंत्र

‘वक्फ’ सुधारणा विधेयकावरून काँग्रेस आक्रमक

मुंबई : प्रतिनिधी
प्रचंड गदारोळात वक्फ दुरुस्ती विधेयक लोकसभेत सादर झाले. अल्पसंख्याक कल्याण मंत्री किरेन रिजिजू यांनी हे विधेयक मांडले. तसेच, हे विधेयक आणणे अत्यंत आवश्यक होते. हे विधेयक आणण्याची आवश्यकता का भासली? हेही त्यांनी सांगितले. यावरून राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी वक्फ सुधारणा विधेयकावरून भाजपावर टीका केली आहे.

दरम्यान, वक्फ सुधारणा विधेयकासंदर्भात प्रसारमाध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ म्हणाले की, संविधान सभेत नियम तयार होत असतानाच जमिनीचे काही विशेष अधिकार दिलेले आहेत. मंदिर, प्रार्थना स्थळे यांना जमिनी दिल्या आहेत, इनाम जमिनी देण्यात आल्या आहेत, महाराष्ट्रात छत्रपतींच्या वारसांनाही जमिनीचे विशेष अधिकार देण्यात आलेले आहेत. देशात भूमिहीनांची संख्या जास्त होती, आचार्य विनोबा भावे यांनी भूदान चळवळ राबवून हजारो एकर जमिन जमा करून भूमिहीनांना दिली.

पंडित नेहरु यांनी कसेल त्याची जमीन म्हणत कूळ कायदा आणला, नंतर सिलिंगचा कायदा आणला, इंदिरा गांधी यांनी जमिनीचे पट्टे देण्याचा निर्णय घेतला, तर युपीए सरकार असताना आदिवासींना वन जमिनीचा हक्क दिला परंतु भाजपा सरकार वक्फ विधेयकाकडे धार्मिक नजरेने पाहून ती जमीन ताब्यात घेऊन उद्योगपती व बिल्डरांच्या घशात घालण्याचा प्रयत्न करत आहे का? धारावीची जमीन अदानींच्या घशात घातली आहे. शक्तिपीठ मार्गाच्या नावाखाली कोकणपट्टा अदानी अंबानींना देण्याचा आट घातला जात आहे, तसाच हा प्रकार आहे असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

तर, वक्फ बोर्ड विधेयकाचा जो विषय आहे, तो त्यांच्या लाखो कोटी रुपयांच्या पॉपर्टी संदर्भातील विषय आहे. भविष्यात त्या प्रॉपर्ट्या आपल्या लाडक्या उद्योगपतींना देता येतील का? त्यासाठी झालेली ही पायाभरणी असल्याचे आम्हाला स्पष्ट दिसते. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार आम्ही सर्व खासदारांनी रात्री येथेच बसून चर्चा केली. संदिग्ध अजिबात नाही. काही गोष्टी फ्लोअरवर गेल्यानंतर करायच्या असतात आणि आम्ही त्या करू, असे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.

दरम्यान, या बिलाचा आणि हिंदुत्वाचा काय संबंध आहे, या विधेयकाचा जर संबंध असेलच तर, वक्फ बोर्डाच्या संपत्तीवर भविष्यात कब्जा मिळवण्यासाठी काही उद्योगपतींना सोपे जावे, त्यासाठी या विधेयकाचे स्पष्ट प्रयोजन दिसत आहे. शिवसेना ही प्रखर हिंदुत्ववादी आहे. हिंदुत्व हिंदुत्वाच्या ठिकाणी आहे आणि अशा प्रकारची बिले त्या ठिकाणी आहेत, अशी टीकाही संजय राऊतांनी केली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR