लातूर : प्रतिनिधी
विलास सहकारी साखर कारखाना, निवळीच्या वतीने चेअरमन श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवार दि. ८ ऑक्टोबर रोजी काटगाव, गंगापूर, तर दि. ९ ऑक्टोबर रोजी बोरी येथे व्हि.एस.आय.पुणे येथील ऊस तज्ञाव्दारे पुर्व हंगामी ऊस लागवड व ऊस उत्पादन वाढ तंत्रज्ञान या विषयावरील मार्गदर्शन कार्यशाळेंचे आयोजन करण्यात आलेले आहे.
यावर्षी पावसाचे प्रमाणे चांगले झाले आहे, परतीचा पाऊसही चांगल पडला. यामुळे मांजरा नदीवरील धरणे, बंधारे यांच्यासह सर्वच ठिकाणी जलसाठा वाढला आहे. या अनुषंगाने विलास सहकारी साखर कारखाना कार्यक्षेत्रात ऊस लागवड करणे सोयीचे व्हावे यासाठी सहकार महर्षी माजी मंत्री दिलीपराव देशमुख, माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख, आमदार धिरज विलासराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाने कारखान्याच्या वतीने पुर्व हंगामी ऊस लागवड व ऊस उत्पादन वाढ तंत्रज्ञान या विषयावरील मार्गदर्शन कार्यशाळा आयोजीत करण्यात आल्या आहेत.
या कार्यशाळेत डॉ. आशोक कडलग प्रमुख शास्त्रज्ञ (पीक उत्पादन व संरक्षण) वसंतदादा शुगर इन्सिटट्युट, पुणे, डॉ. अभिनंदन पाटील शास्त्रज्ञ (कृषि विद्यावेत्ता) वसंतदादा शुगर इन्सिटट्युट,पुणे, डॉ.जी.एस.कोटगीरे शास्त्रज्ञ (वनस्पती रोग शास्त्र विभाग) वसंतदादा शुगर इन्सिटट्युट पुणे सखोल असे मार्गदर्शन करणार आहेत. ही कार्यशाळा मंगळवार दि. ८ ऑक्टोबर रोजी सकाळी ८.३० वा. काटगाव येथील हनुमान मंदीर सभागृहात होईल त्यानंतर सायंकाळी ५ वा. गंगापूर येथील विठ्ठल रुक्मीणी मंदीर सभागृहात होईल तसेच दि. ९ ऑक्टोबर रोजी सकाळी ८.३० वा. बोरी येथील विठ्ठल रुक्मीणी मंदीर सभागृहात होईल.
पुर्व हंगामी ऊस लागवड व ऊस उत्पादन वाढ तंत्रज्ञान या विषयावरील मार्गदर्शन कार्यशाळेस सर्व ऊस उत्पादक शेतकरी बंधुनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन विलास सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन रंिवद्र काळे, कार्यकारी संचालक संजीव देसाई यांनी केले आहे.