पुणे : राज्याचे माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या मुलाचे अपहरण झाल्याच्या बातम्या प्रसारित झाल्यानंतर बँकॉकच्या मार्गावर असलेले ऋषिराज सावंत आता पुण्यात परतले आहेत. आमच्यात कोणताही वाद नाही, पण ऋषिराज घरी न सांगता बँकाकला का गेला, याची माहिती घेणार असल्याची प्रतिक्रिया माजी मंत्री तानाजी सावंत यांनी दिली. दरम्यान, या सगळ््या गोंधळाची पोलिसांकडून चौकशी केली जाणार आहे. दरम्यान, शासकीय यंत्रणेवर दबाव आणून माजी मंत्री तानाजी सावंत यांनी बँकॉकला जाणा-या विमानाला परत पुण्यात येण्यास भाग पाडल्याची चर्चा आहे. यामागील कारणाचा शोध पोलिस घेत आहेत.
पुणे पोलिस सह आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार पुणे कंट्रोल रुमला संध्याकाळी ४ वाजता एक निनावी कॉल आला. त्यामध्ये तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषिराज सावंत यांचे अपहरण झाल्याची माहिती देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने पाऊल उचलत तपास सुरू केला. या दरम्यान तानाजी सावंत हेदेखील पुणे पोलिस आयुक्तालयात पोहोचले आणि त्यांनी असे काही झाले नसल्याची माहिती दिली. चार्टर विमानाने ऋषिराज बाहेर गेला असून त्याचे अपहरण झाले नसल्याचे ते म्हणाले. घरी न सांगता गेल्याने आपल्याला काळजी वाटली, असेही ते म्हणाले.