मुंबई : प्रतिनिधी
राज्याचे मंत्री म्हणून पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी शपथ घेतली. अशामध्ये भुजबळांवर सातत्याने टीका करणा-या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी यावर प्रतिक्रिया देताना, मुख्यमंत्री फडणवीस तुम्हाला सभ्य माणसे मिळत नाहीत का? असा सवाल त्यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांना केला आहे. छगन भुजबळ यांच्या मंत्रिमंडळातील समावेशावरून त्यांनी संताप व्यक्त केला आहे.
दरम्यान, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया म्हणाल्या आहेत की, ‘‘वाह फडणवीस वाह, म्हणजे एका भ्रष्ट मंत्र्याच्या जागी दुसरा भ्रष्ट मंत्री येणार? जनता अशीच भरडली जाणार? की हा माझ्यासारख्या भ्रष्टाचाराविरोधी लढणा-यांना संदेश आहे, की तुम्ही आमचं काहीच वाकडं करू शकत नाही? असा काय नाइलाज आहे? की सभ्य माणसं मिळत नाहीत राजकारणात?’’ असा सवाल त्यांनी विचारला आहे. ‘‘हेच भुजबळ जेव्हा तुरुंगात होते, तेव्हा एक अगदी बिचा-यासारखा फोटो माध्यमांमध्ये दाखवला जात होता. तेव्हा छातीत कळ यायची. मग आता ठणठणीत? किळस वाटते महाराष्ट्राच्या राजकारणाची,’’ अशी टीका त्यांनी यावेळी केली आहे.
मला जेव्हा कळले छगन भुजबळ यांचा शपथविधी होत आहे. तेव्हा मला खूप राग आला. भुजबळ यांच्या विरोधात मी लढले आहे. त्यांच्यावर एफआयआर झाली, त्यांनी अडीच वर्षे तुरुंगात काढली. ते बाहेर येत असताना आम्ही धनंजय मुंडे यांच्या विरोधात लढलो. धनंजय मुंडेंची दहशत बाहेर काढली. धनंजय मुंडे गेल्यानंतर परत त्या जागेवर भुजबळांना जर तुम्ही संधी देत असाल तर असा त्रास जनतेला का देत आहात? आमच्यासारख्या लोकांना त्रास देतात, जे भ्रष्टाचाराविरोधात लढत आहेत. तुम्ही आम्हाला संदेश देता का की आमचे तुम्ही काही बिघडवू शकत नाही. मला खरा हा प्रश्न पडला आहे, की हा लढा पुढे चालू ठेवू की नाही?’’ असे म्हणत अंजली दमानिया यांनी आपला राग व्यक्त केला.