19.9 C
Latur
Saturday, November 23, 2024
Homeसंपादकीय विशेष‘एक्झिट पोल’ आले, उद्या एक्झॅक्ट निकाल !

‘एक्झिट पोल’ आले, उद्या एक्झॅक्ट निकाल !

जगातील सर्वांत मोठी संसदीय लोकशाही व्यवस्था असलेल्या भारताच्या लोकसभा निवडणुकीच्या सातव्या व शेवटच्या टप्प्याचे मतदान शनिवारी पार पडले. १८ व्या लोकसभेसाठी देशातील ९७ कोटी मतदारांपैकी जवळपास ६५ लोकांनी आपला मतदानाचा हक्क बजावला असून, त्यांनी कोणाला कौल दिला आहे ते मंगळवारी स्पष्ट होईल. २०१४ ला सत्तेवर आलेले मोदी सरकार हॅट्ट्रिक करणार का? की देशातील जनता सत्तांतर करणार? याचा फैसला होईल. शेवटच्या टप्प्यातील मतदानाची वेळ संपताच देशातील बहुतांश वृत्तपत्रे व वृत्तवाहिन्यांनी शनिवारी मतदानोत्तर जनमत चाचण्यांचे अंदाज जाहीर केले. बहुतांश ‘एक्झिट पोल’मध्ये मोदी सरकार पूर्वीएवढेच, किंवा त्यापेक्षा अधिक मोठे यश मिळवून सत्तेवर येईल, असे भाकित वर्तवले आहे. भाजपाने या निवडणुकीच्या सुरुवातीला ‘अबकी बार, चारसौ पार’चा नारा दिला होता. परंतु जनमताचा अंदाज आल्यानंतर त्यांनी स्वत:च हा नारा केवळ कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी होता, असे सांगत तिथपर्यंत मजल मारणे शक्य नसल्याची कबुली दिली होती. परंतु काही ‘एक्झिट पोल’नी त्यांना अंदाजात का होईना पण “चारसो पार” नेले आहे. गेल्या काही वर्षांचा अनुभव लक्षात घेतला तर एक गोष्ट नक्की लक्षात येईल की, एक्झिट पोल चे अंदाज अनेकदा चुकले असतील, पण अंदाजात भाजपाला विजयी घोषित करण्यात मात्र त्यांनी सातत्य ठेवले आहे. २००४ च्या “इंडिया शायंिनग”च्या निवडणुकीत एक्झिट पोल मध्ये व्यक्त केलेले अंदाज सपशेल चुकले होते व वाजपेयी यांना सत्तेवरून पायउतार व्हावे लागले होते.

त्यावेळी अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीला २४० ते २७५ जागा मिळतील असा अंदाज बहुतांश एक्झिट पोल मध्ये वर्तवण्यात आला होता. प्रत्यक्षात रालोआ ला १८७ व काँग्रेसप्रणीत संयुक्त पुरोगामी आघाडीला २१८ जागा मिळाल्या व मनमोहनंिसग यांचे सरकार सत्तेत आले. २०१७ च्या उत्तरप्रदेश विधानसभेच्या निवडणुकीत सर्वच राजकीय पंडितांनी त्रिशंकू स्थिती निर्माण होईल असे भाकीत वर्तवले होते. प्रत्यक्षात सव्वा तीनशे जागा ंिजकून प्रचंड बहुमताने योगी सत्तेत आले. मागच्या वर्षी झालेल्या छत्तीसगढ च्या निवडणुकीत सर्व एक्झिट पोल मध्ये काँग्रेसचीच सत्ता कायम राहील असे भाकीत केले होते आणि प्रत्यक्षात भाजप पूर्ण बहुमतासह सत्तेत आली. शेवटी अंदाज ते अंदाज असतात व काही वेळा चुकतातही. यावेळी हे अंदाज अचूक ठरतात की नाही ? एक्झिट पोल “एक्झॅक्ट पोल” ठरणार की नाही हे येत्या चोवीस तासात कळेल. तोवर अंदाज हाच निकाल समजून काही लोक जल्लोषाचा तयारीला लागले आहेत. देशात मोदी सरकार हॅटट्रिक करेल असे अंदाज वर्तवतानाच महाराष्ट्रात मात्र भाजपची घसरण होईल, असा अंदाज बहुतांश सर्व सर्वेक्षणामध्ये व्यक्त करण्यात आला आहे. आगामी विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने ही बाब अतिशय महत्वाची असल्याने एक्झॅक्ट निकालाकडे सर्वांच्याच नजरा लागल्या आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अश्वमेध रोखण्यासाठी विरोधी पक्षाने “इंडिया” आघाडी तयार केली व शक्य होईल तेवढ्या ठिकाणी एकास एक उमेदवार देऊन निवडणुकीत रंगत आणली होती. निष्प्रभ विरोधकांवर सहज मात करू असे भाजपाला वाटत होतें परंतु त्यांना अपेक्षेपेक्षा अधिक कडवी लढत मिळाली, मुकाबला करताना दमछाक झाली. त्यामुळे यावेळचे निकाल काय येतील याबाबत राजकीय पंडित यावेळी गोंधळलेले दिसत होते. उलटसुलट तर्क व्यक्त केले जात होते. परंतु शेवटच्या टप्प्याचे मतदान झाल्यानंतर अवघ्या काही मिनिटांत आलेल्या सर्वच मतदानोत्तर चाचण्यांमधून मात्र बहुतांश सर्वांनीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी साडेतीनशेहून अधिक जागांवर विजय मिळवून तिस-यांदा सत्ता स्थापन करेल, असा अंदाज अगदी एकसुरात व्यक्त केला आहे.

विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीला १२५ ते १५० पर्यंतच जागा मिळतील, असा त्यांचा अंदाज आहे. २०१९ च्या निवडणुकीत भाजपाला ३०३ जागा मिळाल्या होत्या. यातील २२० जागा दहा राज्यातल्या होत्या. उत्तरप्रदेश, बिहार, मध्यप्रदेश, गुजरात, राजस्थान, हरियाणा, छत्तीसगढ, झारखंड, उत्तराखंड व हिमाचल प्रदेश या राज्यांमध्ये लोकसभेच्या २४४ जागा आहेत. त्यापैकी २२० जागा भाजपाने काबीज केल्या होत्या. दक्षिणेत भाजपाचा फारसा प्रभाव नाही. दक्षिण भारतातील १३२ जागांपैकी केवळ २९ जागा भाजपाला मिळाल्या होत्या. त्यातील कर्नाटकमधील २५ जागा कमी केल्या तर उर्वरित राज्यात त्यांना केवळ चार जागा होत्या. कर्नाटकातील सत्ता हातातून गेल्यामुळे त्यांना मागच्या निवडणुकीएवढे तरी यश मिळणार का ? अशी शंका व्यक्त केली जात होती. त्यामुळे भाजपाचे “चारशे पार” चे स्वप्न अशक्यप्राय दिसत होते.

काल आलेल्या बहुतांश चाचण्यांमध्ये मात्र यावेळी दक्षिणेतही भाजपाला चांगले यश मिळेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. कर्नाटक, बिहार, ओरिसा, तामिळनाडू आदी राज्यांबाबत एक्झिट पोलमध्ये व्यक्त केलेले अंदाज सहज पचनी पडणारे नाहीत.त्यामुळे “एक्झॅक्ट” निकाल येईपर्यंत उलटसुलट चर्चा सुरू राहतील. एक्झिट पोल च्या अंदाजांमुळे स्वाभाविकच विरोधकांमध्ये तिखट प्रतिक्रिया उमटली आहे. हे एक्झिट पोल नाहीत, तर मोदी मीडिया पोल आहेत, अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी व्यक्त केली. इंडिया आघाडीला २९५ हून अधिक जागा मिळतील, असा दावा त्यांनी केला.समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांनीही आमच्या खासदारांची संख्या दुप्पट; तर भाजपाची निम्मी होईल. हा खरा एक्झिट पोल आहे. इंडिया आघाडीचे सरकार सत्तेत येणार आहे, असा दावा केला. एक्झिट पोल अनेकदा चुकीचे ठरल्याची आठवण विरोधक देतायत. ते चुकीचे ही नाही.

महाराष्ट्रात सत्तांतर घडवले, उद्धव ठाकरेंचे सरकार सत्तेवरून घालवले, दोन मोठे पक्ष फुटले, त्यांचे दोन तृतीयांश आमदार, खासदार सोबत आले. मनसे ला पटवले. तरीही महविकास आघाडीचे आव्हान थोपवणे युतीला शक्य झालेले नाही, असे या अंदाजांवरून दिसते आहे. राज्यातील राजकीय वातावरण ही युतीसाठी फारसे अनुकूल नव्हते. फोडाफोडीच्या विधिनिषेधशून्य राजकारणाबद्दल जनतेत असलेला रोष, शेतक-यांचे प्रश्न, आरक्षणाची आंदोलने यामुळे २०१९ चां आकडा गाठणे शक्य नाही याची जाणीव भाजपाला होती. परंतु फार मोठा खड्डा पडू नये यासाठी त्यांची धडपड सुरू होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा आठवड्यातून दोन वेळा महाराष्ट्रात येत होते. सभा, रोड शो घेत होते. हीच बाब बरीच बोलकी आहे. लोकसभा निवडणुकीत महविकास आघाडीने बाजी मारली तर चार महिन्यांवर आलेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रात मोठी डागडुजी करण्याची वेळ महायुतीवर येणार आहे. नेतृत्वबदलाचा निर्णय घेऊन ते खेळ आणखी खराब करणार नाहीत. पण भाजपात मात्र मोठे फेरबदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

अभय देशपांडे

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR