पुणे : प्रतिनिधी
वाहनांना उच्च सुरक्षा क्रमाकांच्या पाट्या (हाय सिक्युरिटी नंबर प्लेट) बसवण्याची सक्ती काही गुजराती कंपन्यांची तिजोरी भरण्यासाठी करण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाने केला आहे. केंद्र सरकारने ही सक्ती केली आहे. त्यातही अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात या पाट्यांची किंमत दुप्पट ठेवण्यात आली असल्याची टीका करून पक्षाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही या प्रकारच्या पाट्यांना तीव्र विरोध केला आहे.
गुजरातमध्ये दुचाकीसाठी १६० रुपये आहेत तर महाराष्ट्रात ४५०, गोव्यात चारचाकीसाठी २०३ रुपये आहेत तर महाराष्ट्रात ७४५ अशी बरीच तफावत दिसत असल्याचे निदर्शनास आल्याची माहिती जगताप यांनी दिली. गोवा, आंध्र प्रदेश, राजस्थान, केरळ या राज्यांमध्येही गुजरातमधील याच कंपन्यांना नंबरप्लेटचे काम मिळाले आहे असे त्यांनी सांगितले. त्यामुळेच ही सक्ती मागे घ्यावी यासाठी आंदोलन करत असल्याचे ते म्हणाले. तसेच पुणे शहरातील रेडियम व्यावसायिक या आंदोलनात सहभागी झाले.
एकट्या पुणे शहरातील ४० ते ५० लाखांच्या आसपास दुचाकी व १० लाखाच्या आसपास चारचाकी वाहनांची संख्या आहे. आजपर्यंत ९७ हजार नागरिकांनी ही पाटी बसवण्यासाठी ऑनलाईन नोंदणी केली. त्यातील फक्त २० हजार नागरिकांच्या वाहनांना ही पाटी बसवणे प्रशासनाला शक्य झाले आहे. त्यामुळे ३१ मार्चपूर्वी किमान पुण्यात तरी सर्व वाहनांना ही पाटी बसवणे शक्य नाही.