20.5 C
Latur
Monday, December 23, 2024
Homeमहाराष्ट्रमहाविकास आघाडीला एमआयएमची साथ?

महाविकास आघाडीला एमआयएमची साथ?

जलील यांच्या विधानाने चर्चांना उधाण

छत्रपती संभाजीनगर : प्रतिनिधी
महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत युतीबाबत चर्चा सुरू असल्याचे विधान करून एमआयएम नेते इम्तियाज जलील यांनी खळबळ उडवून दिली आहे. मात्र मविआच्या कुठल्या नेत्यांशी चर्चा केली, आमच्यासोबत काही चर्चा नाही. एमआयएम भाजपाची बी टीम आहे, असा आरोप ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवेंनी केला. दानवेंना प्रत्युत्तर देताना इम्तियाज जलील म्हणाले की, आमच्यासोबत जे नेते चर्चेला बसले होते, त्यांनी सांगितले आमचे छोटे नेते आहेत त्यांना चर्चेबद्दल सांगू नका. मी कुणासोबत चर्चेला बसलोय हे मला माहिती आहे.

कुणासोबत चर्चा झाली हे मला सांगण्याची गरज नाही. परंतु ते नेते अंबादास दानवेंपेक्षा मोठे आहेत हे नक्की, आपली चर्चा कुणालाही सांगू नका, प्राथमिक चर्चा झाल्यावर पुढे बोलू अशी संबंधित नेत्यांनी चर्चेवेळी अट घातली होती. मुंबईत ही बैठक झाली. अंबादास दानवे विरोधी पक्षनेते आहेत. त्यांनी माहिती घ्यावी, मी मुंबईला गेलो होतो, कुठल्या हॉटेलला थांबलो होतो. मला कोण कोण भेटायला आले होते हे जाणून घ्यावे असा टोला त्यांना लगावला. जलील माध्यमांच्या मुलाखतीत हे बोलले.

तसेच उद्धव ठाकरे विधानसभेला मुस्लिम उमेदवार देणार ही आनंदाची बाब आहे. लोकसभेत त्यांनी एकही उमेदवार दिला नाही. लोकांनी नरेंद्र मोदींविरोधात भाजपाविरोधात जाऊन त्यांना मतदान केले. उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेसलाही ते कळले आहे. तशी परिस्थिती विधानसभेला होणार नाही. त्यामुळे मुस्लिमांची मते घ्यायची असतील तर मुस्लिम उमेदवार द्यावे लागतील हे त्यांना कळाले आहे. फक्त उमेदवारी देऊ नका तर त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी घ्या. चांगला उमेदवार द्या, असे आव्हान जलील यांनी उद्धव ठाकरेंना दिले.

त्याशिवाय एमआयएमसोबत युती नाही असे अंबादास दानवे बोलतात, परंतु शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेसने त्यांना अधिकार दिलेले आहेत का? तुमचे नेते उद्धव ठाकरे आहेत त्यांना बोलू द्या. त्यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगावे, एमआयएमसोबत युती नको, ते किरकोळ आहेत, त्यांची ताकद नाही. मग आमची ताकद आम्ही दाखवू. मुस्लिम मते सगळ्यांना हवीत. शरद पवार, काँग्रेस, उद्धव ठाकरे, अजित पवार सगळ्यांना मते हवीत. एमआयएमकडून मी महाविकास आघाडीला ऑफर मीडियाच्या माध्यमातून दिली होती. त्यावेळी आम्हाला लेखी प्रस्ताव हवा असे काही नेते म्हणाले, त्यांनीही माध्यमांमधून हे सांगितले असते तर मी लेखी प्रस्तावही पाठवायला तयार आहे. हो किंवा नाही असे थेट सांगा, उडवाउडवीची उत्तरे देऊ नका. महाविकास आघाडीचे ३ मोठे नेते आहेत त्यांनी बोलावं, उद्धव ठाकरेंनी सांगावे, अंबादास दानवेंनी जे सांगितले तसे आम्ही एमआयएमला घेणार नाही. तिथे विषय संपतो, शरद पवारांनी सांगावे, आम्हाला एमआयएम चालत नाही, असेही जलील यांनी म्हटले आहे.

दरम्यान, शुक्रवारपासून आम्ही अर्जवाटप करण्यास सुरुवात करणार आहोत. त्यानंतर इच्छुकांचे अर्ज येण्याच्या तारखेपर्यंत आम्ही थांबू मात्र त्यानंतर आमचे तिकिटवाटप झाले, उमेदवार निश्चित झाले तर काही किंतु-परंतु होणार नाही. महाविकास आघाडीने लवकरात लवकर निर्णय घ्यावा. आम्ही वाट बघणार नाही. आम्ही प्रक्रिया सुरू केली आहे, असा अल्टिमेटम माजी आमदार आणि एमआयएम नेते इम्तियाज जलील यांनी दिला आहे.

एमआयएमसोबत कुठलीही युती नाही – अंबादास दानवे
महाविकास आघाडीसोबत इम्तियाज जलील यांची चर्चा झाली असेल तर कुणासोबत झाली हे सांगितले पाहिजे. आमच्या शिवसेनेसोबत कुणाची चर्चा होण्याचा प्रश्न नाही. खोटी माहिती समोर आणायची, एमआयएम ही भाजपाची बी टीम म्हणून काम करते. मोठ्या प्रमाणात मुस्लिम मते महाविकास आघाडीसोबत लोकसभेत होती, आता विधानसभेलाही राहतील.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR