पुणे : प्रतिनिधी
एमआयटी आर्ट, डिझाईन व टेक्नॉलॉजी विद्यापीठ(एमआयटी एडीटी), पुणे येथे केंद्रीय शिक्षण मंत्रालयाची इनोव्हेशन सेल व एआयसीटीई द्वारे राष्ट्रीय स्मार्ट इंडिया हॅकेथॉन-२०२४ (एसआयएच) स्पर्धेच्या हार्डवेअर गटाच्या अंतिम फेरीचे आयोजन करण्यात आले आहे.
विद्यापीठ परिसरातील संत श्री ज्ञानेश्वर महाराज विश्वशांती डोममध्ये ११ ते १५ डिसेंबर २०२४ दरम्यान देशभरातील २९ संघांमध्ये ही राष्ट्रीय स्पर्धा रंगणार आहे. ज्यात, ते कोळसा मंत्रालय आणि गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयासमोरील समस्यांवर पर्याय देण्यासाठी त्यांच्या नावीन्यपूर्ण कल्पना मांडतील. प्रत्येक समस्येच्या विजेत्यास १ लाखांचे बक्षीस दिले जाईल.
स्पर्धेचा उद्घाटन समारंभ ११ डिसेंबर रोजी पुष्कराज ग्रुपचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक शैलेन्द्र गोस्वामी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे. एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कुलगुरू तथा कार्यकारी अध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश कराड हे या कार्यक्रमाचे अध्यक्ष असतील. सोबतच, डॉ. सुनीता कराड, प्र. कुलगुरू डॉ. मोहित दुबे, डॉ. रामचंद्र पुजेरी, कुलसचिव डॉ. महेश चोपडे, नोडल सेंटर मुख्य अधिकारी डॉ. रेखा सुगंधी, सहाय्यक नोडल अधिकारी डॉ. निशांत टिकेकर, स्पर्धा निमंत्रक प्रा. सुरेश कापरे आदी मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत.
या स्पर्धेचे केंद्रीय उद्घाटन ११ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता शिक्षण मंत्रालयाच्या वतीने आभासी पद्धतीने केले जाईल. २०१७ साली सुरू झालेला स्मार्ट इंडिया हॅकेथॉन (एसआयएच) हा भारतातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय आणि सामाजिक समस्यांवर उपाय शोधण्यासाठी प्रोत्साहन देणारा उपक्रम आहे. हा जगातील सर्वांत मोठा ओपन इनोव्हेशन मॉडेल म्हणून ओळखला जातो. यंदा संस्थात्मक हॅकेथॉन्समध्ये २४० टक्के वाढ झाली आहे. २०२३ मधील ९०० हॅकेथॉन्सच्या तुलनेत २०२४ मध्ये २२४७ हॅकेथॉन आयोजित झाले. यासह, ४९,००० विद्यार्थी संघांनी राष्ट्रीय स्तरासाठी पात्रता मिळवली असून त्यांनी ५४ मंत्रालये, विभाग आणि उद्योग यांनी दिलेल्या २५०+ समस्यांवर काम केले आहे, अशी माहिती डॉ. रेखा सुगंधी यांनी पत्रकार परिषदेत दिली.