31.1 C
Latur
Sunday, April 20, 2025
Homeमहाराष्ट्रएसटी कर्मचा-यांचे व्याज बुडीत

एसटी कर्मचा-यांचे व्याज बुडीत

१२४० कोटींची कपात केलेली रक्कम पीएफमध्ये भरलीच नाही

मुंबई : प्रतिनिधी
गेल्या काही वर्षांपासून आर्थिक अडचणीत सापडलेल्या एसटी महामंडळाच्या कर्मचा-यांसमोर आणखी एक संकट उभे राहिले आहे. कर्मचा-यांच्या पगारातून कापलेली १२४० कोटी रुपयांची भविष्य निर्वाह निधीची (पीएफ) रक्कम पीएफ ट्रस्टमध्ये जमा न केल्याने १०० कोटी रुपयांचे व्याज बुडाल्याची माहिती महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगेंनी दिली आहे.

दरम्यान, मागच्या काही वर्षांपासून एसटी महामंडळाला मोठी घरघर लागली आहे. एसटी बसची वाईट अवस्था असून कर्मचा-यांना वेळेवर पगार देखील मिळत नाही. एसटी कर्मचा-यांनी बंडाचा मोठा पवित्रा उचलत काही दिवस एसटी सेवा आपल्या मागण्यांसाठी पूर्णपणे बंद ठेवली होती. त्यावेळी त्यांच्या काही मागण्या देखील मान्य झाल्या होत्या. या आधी मार्च महिन्याचे केवळ ५६ टक्के वेतन कर्मचा-यांना देण्यात आले होते. त्यानंतर विरोधकांनी सरकारला धारेवर धरल्यानंतर उर्वरित वेतन एसटी कर्मचा-यांच्या खात्यावर जमा करण्यात आले.

एसटी कर्मचा-यांचा २०१८ पासूनचा महागाई भत्ता मिळालेला नसल्याने कर्मचारी नाराज आहेत. आता त्यामध्ये एक मोठी माहितीही पुढे येताना दिसत आहे. एसटी कर्मचा-यांची १२४० कोटींची रक्कम पीएफ ट्रस्टमध्ये भरलीच गेली नाही. एसटी कर्मचा-यांच्या पीएफ गुंतवणुकीतील १०० कोटींचे व्याज बुडीत गेले आहे.

फेब्रुवारी २०२४ पासून पीएफची आणि ग्रॅच्युईटीची रक्कमही भरली गेली नाही. मात्र, कर्मचा-यांच्या पगारीतून ही रक्कम कपात होतेय. रक्कम भरली गेली नसल्याने एसटी कर्मचा-यांच्या पीएफ गुंतवणुकीतील १०० कोटींचे व्याज बुडीत आहे. एसटी कर्मचा-यांच्या मागील काही दिवसांपासून वेगवेगळ्या समस्या या पुढे येताना दिसत आहेत. त्यामध्येच आता ही पीएफच्या रकमेची बाब पुढे आली आहे.

भंगार झालेल्या एसटी बस रस्त्यावर
एसटीचे कर्मचारी आणि अधिका-यांच्या पगारातून ही पीएफची १२४० कोटींची रक्कम कपात करण्यात आली. मात्र, ती भरण्यात आली नाही. यामुळेच व्याज बुडीत आहे. एसटी कर्मचा-यांचा पगार हा वेळेवर होत नसल्याचाही आरोप कर्मचा-यांकडून केला जातो. पगार सात तारखेला होत नाहीत, कधी आठ, कधी दहा तारखेला पगार होतो. मुळात म्हणजे मागील काही वर्षांपासूनच एसटी महामंडळाची दयनीय अवस्था झाल्याचे बघायला मिळत आहे. ग्रामीण भागामध्ये भंगार झालेल्या एसटी बस रस्त्यावर धावतात.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR