22.3 C
Latur
Sunday, November 24, 2024
Homeलातूरऔद्योगिक प्रशिक्षण संस्थेला १ कोटीचा धनादेश सुपूर्द

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला १ कोटीचा धनादेश सुपूर्द

लातूर : प्रतिनिधी
हरंगुळ बु. येथील संवेदना दिव्यांग औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या रुपाने आज राज्यातील पहिल्या दिव्यांग औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे उद्घाटन होत आहे. ही संस्था दिव्यांग बांधवांना स्वावलंबी बनविण्याच्या उपक्रमात दिशादर्शक ठरेल, असा विश्वास कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी व्यक्त्त केला. संवेदना दिव्यांग औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या उद्घाटन समारंभात दूरदृश्य प्रणालीद्वारे मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे, खासदार सुधाकर शृंगारे, आमदार संभाजी पाटील निलंगेकर, आमदार अभिमन्यू पवार, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक दिगंबर दळवी, जनकल्याण समितीचे प्रांत अध्यक्ष अजित मराठे, हरंगुळच्या सरपंच शीतल झुंजारे, संवेदना समितीचे अध्यक्ष डॉ. राजेश पाटील यांची या कार्यक्रमाला उपस्थिती होती. राज्य शासनामार्फत संवेदना दिव्यांग औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला 1 कोटी रुपयांचा धनादेश व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक दिगंबर दळवी यांनी सुपूर्द केला. मान्यवरांच्या हस्ते कोनशीला अनावरण करून संवेदना दिव्यांग औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे उद्घाटन करण्यात आले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिव्यांग बांधवांना नवी ओळख मिळवून दिली. त्यांच्यासाठी विविध उपक्रम राबविले. त्यामुळे सर्वसामान्यांचा दिव्यांग बांधवांकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला आहे. लातूर येथे संवेदना प्रकल्पाच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांसाठी फार मोठे काम उभा राहिले आहे. अतिशय तळमळ आणि चिकाटीने ही संस्था दिव्यांग बांधवांसाठी काम करीत आहे. या संस्थेत दिव्यांग बांधवांसाठी स्वतंत्र औद्योगिक प्रशिक्षण संस्था सुरु करण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. याठिकाणी दिव्यांग बांधवांना औद्योगिक प्रशिक्षण देण्यात येणार असून त्यामुळे दिव्यागांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असे ना. लोढा यांनी सांगितले.

राज्य शासनामार्फत स्वतंत्र दिव्यांग कल्याण मंत्रालय स्थापन करून विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. या माध्यमातून दिव्यांगांच्या सक्षमीकरणासाठी प्रय्त्न सुरु आहेत. नव्याने सुरु होत असलेल्या संवेदना औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रशिक्षणामुळे दिव्यांग बांधव स्वावलंबी बनतील. तसेच त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी मदत होईल, असे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी सांगितले. यावेळी खासदार सुधाकर शृंगारे, आमदार संभाजीरा पाटील निलंगेकर, जिल्हाधिकारी वर्षा ठाकुर-घुगे यांनी मनोगत व्यक्त केले तर मराठे यांनी अध्यक्षीय समारोप केला.

दिव्यांग कल्याणासाठी विशेष कामगिरीबद्दल विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालायचे अधिष्ठाता डॉ. समीर जोशी, खोपेगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच तेजाबाई मोरे, विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय रुग्णालयातील परिचारक योगेश वाघ यांचा यावेळी गौरव करण्यात आला. तसेच संवेदना दिव्यांग औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या उभारणीमध्ये सहकार्य करणारे लातूर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे माजी प्राचार्य विठ्ठल गाडेकर, प्रभारी प्राचार्य मनीषा बोरूळकर यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR