23.1 C
Latur
Saturday, September 28, 2024
Homeलातूरऔशातील रस्ता रुंदीकरणाचे कोट्यवधी पाण्यात

औशातील रस्ता रुंदीकरणाचे कोट्यवधी पाण्यात

औसा : संजय सगरे
औसा शहरातील मुख्य रस्त्यावरील तिस-या टप्प्याचा रस्ता रुंदीकरणासाठी आमदार अभिमन्यू पवार यांनी अथक परिश्रमाने शासनाकडून आणलेला कोट्यवधी रुपयांचा निधी पालिका प्रशासनाच्या  निष्काळजीपणामुळे व कंत्राटदाराच्या ‘कंजूषी’मुळे पाण्यात गेला आहे .औसेकरांच्या एका मोठ्या स्वप्नावर  ‘शंकरा’  ने पाणी फिरवले आहे. पहिल्याच पावसात या रस्ता रुंदीकरणाचे पितळ उघडे पडले आहे.
औसा शहरासाठी अत्यंत जिव्हाळ्याचा असणारा तिसरा टप्पा रस्ता रुंदीकरण गेल्या अनेक वर्षापासून रखडले  होते. तत्कालीन  पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांच्याकडे  याकामासाठी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्रीशैल उटगे, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अमर खानापूरे यांनी सतत पाठपुरावा करुन तत्कालीन प्रशासक तथा उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे यांच्या काळात रुंदीकरणासाठी भूसंपादन व १२ मीटर रुंदी व ३७० मीटर लांबीचा प्रस्ताव शासनाकडे २९ मार्च २०२२ रोजी  पाठविण्यात आला होता. यासाठी ५ कोटी ५७ लाख रुपये निधीची मागणी करण्यात आली होती प्रस्ताव मंजूरी अंतिम टप्प्यात असतानाच राज्यात सत्तांतर झाले व राज्य सरकारमध्ये औशाचे आमदार अभिमन्यू पवार यांच्या शब्दाला  बळ प्राप्त झाले. आमदार  पवार यांनी आपले वजन वापरुन औसा शहर रस्ता रुंदीकरण  तिसरा टप्पासाठी ६ कोटी रुपये निधी उपलब्ध करुन आणला .
आमदार पवार यांंनी या रस्ता रुंदीकरण काम १५ मार्च २०२४ रोजी तत्कालीन मुख्याधिकारी अजिंक्य रणदिवे व अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत या रस्ता रुंदीकरण कामाची सुरुवात झाली परंतू भूसंपादन प्रक्रियेत नगर पालिकेतील झारीच्या शुक्राचा-यानी भेदभाव केला. सरळ रस्ता नागमोडी केला हितसंबधी मंडळीच्या इमारतीना धक्का लागू नये याची काळजी घेतली व नाली काम सरळ होण्याऐवजी नागमोडी झाले आहे हा प्रकार रस्त्याच्या  दोन्ही बाजूला होत आहे .शहरातील  बड्या मंडळीच्या मालमत्तांचे भूसंपादन झाले नाही .या मंडळींना नागमोडी वळणाचा फायदा करुन दिला व आर्थिक मोबदला ही दिला आहे .
लातूर वेस, हनुमान मंदिर ते जामा मस्जिद हे रस्ता रुंदीकरण केवळ एक फार्स ठरत आहे.शहरवासियांसाठी आणलेला कोट्यवधींचा निधी पहिल्याच पावासात शंकराच्या कृपेने व पालिकेतील भ्रष्ट यंत्रणेमुळे वाहून गेला आहे .  पावसाळ्यापूर्वी हा रस्ता पूर्ण करण्याचे निर्देश दिले असताना जून महिना संपत आला तरी दोन्ही बाजूच्या नालीचे बांधकामही पूर्ण झालेले नाहीत तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या नाल्या अत्यंत चुकीच्या पद्धतीने व (जिसकी लाटी उसकी भैस) नागमोडी आकाराचा झाल्याने पाण्याला नैसर्गिक उतार मिळणार नाही अशी भीती व्यक्त केली जात आहे.  याबाबत एमआय एमचे मुजफ्फरअली इनामदार यांनी सातत्याने पाठपुरावा केला. वर्तमानपत्रांमध्ये तशा आशयाच्या बातम्याही प्रसीद्ध झाल्या परंतु काही परिणाम झाला नाही .
या कामी कोणीच लक्ष देण्यास तयार नसल्याने नागरिकात असंतोष पसरला आहे. रविवार दि २३ जून रोजी पडलेल्या पावसामुळे सानप हॉस्पिटल समोर गुडघाभर पाणी साचले होते. रस्ता रुंदीकरणासाठी पूर्वीचा रस्ता खोदल्यामुळे सानप हॉस्पिटलसमोर रविवारी गुडघाभर पाणी साचल्याने दुचाकीस्वार, ऑटोरिक्षा व पायी चालणा-या प्रवाशांना हाल सहन कराव्या लागल्या.  रविवारी बाजारचा दिवस असल्याने तसेच नाथ संस्थांच्या ज्येष्ठमाशी उत्सवाचा गोपाळकाला असल्याने गावागावातून आलेल्या,भाविक नागरिकांची व शहरातील व्यवसायिकांची अत्यंत गैरसोय झाली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR