19.4 C
Latur
Thursday, December 12, 2024
Homeउद्योगकंपन्यांच्या नफ्यात ४०० टक्के वाढ; पगारवाढीत मात्र कंजुषी!

कंपन्यांच्या नफ्यात ४०० टक्के वाढ; पगारवाढीत मात्र कंजुषी!

खासगी क्षेत्रातील पगाराविषयी केंद्र सरकार चिंतेत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
नोकरीतील उत्पन्नात गरजा भागत नसल्याने नोकरदारांवर कर्ज काढण्याची वेळ आली आहे. एकीकडे कंपन्या मोठा नफा कमावून गलेलठ्ठ होत चालल्या आहेत. तर दुसरीकडे तुलनेत पगारवाढ तुटपुंजी करत आहेत. खासगी क्षेत्रातील कर्मचा-यांच्या पगारवाढीच्या संथ गतीने सरकारच चिंतेत आहे. कमी पगाराचा परिणाम आता देशाच्या विकासावर होत आहे. अलीकडेच देशातील आर्थिक विकासाची चिंताजनक आकडेवारी समोर आली.

केंद्र सरकार खासगी क्षेत्रातील कर्मचा-यांच्या कमी पगाराबद्दल अधिक चिंतित आहे. कारण खासगी कंपन्यांचा नफा वाढत असताना पगारवाढीचा आलेख सपाट आहे. पगारवाढ मंदावल्याने त्याचा वापर आणि मागणीवर परिणाम झाला आहे.

भारत सरकारच्या वतीने फिक्की आणि क्वॅश कॉर्प लिमिटेडने तयार केलेल्या आकडेवारीतून ही धक्कादायक माहिती समोर आली. या अहवालानुसार अभियांत्रिकी, उत्पादन आणि पायाभूत सुविधा क्षेत्रात केवळ ०.८ टक्के पगार वाढला आहे. एफएमसीजी कंपन्यांमध्येही पगार केवळ ५.४ टक्क्यांनी वाढला. खासगी कंपन्यांच्या कर्मचा-यांची अवस्था बिकट होण्याचे आणखी एक कारण म्हणजे त्यांचे पगार वाढण्याऐवजी घसरत असल्याचे म्हणता येईल, त्यात महागाईचाही समावेश आहे. कारण या कर्मचा-यांच्या क्रयशक्तीत मोठ्या प्रमाणात घट होण्याची चिन्हे आहेत.

उद्योगजगताला आवाहन : खासगी क्षेत्रातील कर्मचा-यांच्या कमी पगारामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेतील मंदीच्या संदर्भात सरकारने दखल घेतली आहे. भारत सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार व्ही. अनंत नागेश्वरन यांनी उद्योगांना या विषयात लक्ष घालण्याचे आवाहन केलं आहे.

भविष्यात कॉर्पोरेट क्षेत्रालाच धोका : दोन कॉर्पोरेट कॉन्फरन्समध्ये नागेश्वरन म्हणाले की, कर्मचा-यांचे पगार वाढवले ​​नाहीत तर देशाचे मोठे नुकसान होऊ शकते. याचा फटका शेवटी कॉर्पोरेट क्षेत्रालाही सहन करावा लागणार आहे. खासगी कर्मचा-यांच्या पगारात सुधारणा न झाल्यास त्यांची क्रयशक्ती कमी होऊन बाजाराला मोठा फटका बसेल. उद्योगातील उत्पादनांना बाजारात मागणी राहणार नाही. कॉर्पोरेटसाठी हे आत्मघाती पाऊल असेल.

नफा चौपट वाढला, पगार वाढ ४% ही नाही
जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत जीडीपी केवळ ५.४ टक्क्यांनी वाढल्याने खासगी कर्मचा-यांच्या कमी पगारामुळे सरकारही तणावात आहे. यामागचे मुख्य कारण म्हणजे २०१९ ते २०२३ या कालावधीत कॉर्पोरेट कंपन्यांच्या नफ्यात ४ पटीने म्हणजेच ४०० टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे, तर याच काळात खासगी कर्मचा-यांच्या पगारात चार टक्क्यांनीही वाढ झालेली नाही.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR