16.9 C
Latur
Saturday, January 4, 2025
Homeसोलापूरकमी पटसंख्येच्या झेडपी शाळांवरील शिक्षकांचा प्रश्न 'जैसे थे'

कमी पटसंख्येच्या झेडपी शाळांवरील शिक्षकांचा प्रश्न ‘जैसे थे’

सोलापूर : जिल्हा परिषदेच्या ज्या शाळांचा पट १ ते २० पर्यंत आहे, अशा शाळांवर सेवानिवृत्त शिक्षक नेमण्याचा शासन निर्णय निघाला. त्यानंतर त्या निर्णयात बदल करून दहापर्यंत पटसंख्या असलेल्या शाळांवर कंत्राटी शिक्षक (डीएड, बीएडधारक सुशिक्षित तरुण-तरुणी) नेमण्याचा निर्णय झाला.
आता पुन्हा तो निर्णय थांबविण्यात आला असून कमी पटसंख्येच्या झेडपी शाळांवरील शिक्षकांचा प्रश्न ‘जैसे थे’च आहे. शालेय शिक्षण विभागाला यासंदर्भात आता नूतन शिक्षणमंत्र्यांच्या आदेशाची प्रतीक्षा आहे.

राज्यातील १४ हजार ७८३ शाळांमधील पटसंख्या १ ते २० पर्यंत असून त्यात सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या २७६६ पैकी जवळपास दीडशे शाळा आहेत. त्यात ५३ शाळांचा पट दहापेक्षा कमी आहे. या शाळांवर कंत्राटी शिक्षक घेण्याचा निर्णय झाला होता. पण, त्याची कार्यवाही थांबल्याने शासनाच्या धरसोड भूमिकेवर डीएड-बीएडधारक तरुण-तरुणी वैतागले आहेत. राज्यात ३० ते ३२ हजार शिक्षकांची भरती केली जाईल, अशी ग्वाही तत्कालीन शिक्षणमंत्र्यांनी दिली होती. मात्र, अजूनही जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये सात हजारांवर शिक्षक कमीच आहेत. अजूनही समानीकरणाअंतर्गत हजारो शाळांमध्ये पटसंख्येच्या तुलनेत शिक्षक भरलेले नाहीत.

आता पवित्र पोर्टलच्या माध्यमातून नवीन वर्षात शिक्षक भरती होणार असून ज्या जिल्हा परिषदांमधील शिक्षकांच्या रिक्तपदांचे रोस्टर (बिंदूनामावली) अचूक आहे, कोणाचीही हरकत नाही तेथील ८० टक्के पदभरती होणार आहे. दुसरीकडे खासगी अनुदानित माध्यमिक शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती देखील झालेली नाही. नवीन वर्षात शालेय शिक्षण विभागाकडून शिक्षक भरतीची खुशखबर येवू शकते. जवळपास १० हजार शिक्षकांची भरती होवू शकते, असे शालेय शिक्षण विभागातील वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.

टीईटी पार पडल्यानंतर या परीक्षेचा निकाल फेब्रुवारीअखेर अपेक्षित आहे. उत्तीर्ण झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्याचे पेपर बारकाईने तपासले जात आहेत. प्रत्येक उत्तराला अचूक गुण दिल्याची खात्री अधिकाऱ्यांकडून केली जात आहे. त्यामुळे निकालास आणखी दीड ते दोन महिने लागू शकतात. त्यानंतर ‘टीईटी’त उत्तीर्ण विद्यार्थ्यांची जून-जुलैमध्ये ‘टेट’ घेण्याचे नियोजन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने केले आहे.

दहापेक्षा कमी पटाच्या शाळांवर कंत्राटी शिक्षक घेण्याचा निर्णय यापूर्वीच झाला आहे. त्यासंदर्भातील मार्गदर्शक सूचना प्राप्त झाल्यानंतर त्यानुसार कार्यवाही केली जाईल. शालेय शिक्षण विभागाकडून त्या मार्गदर्शक सूचनांची प्रतीक्षा आहे.असे जिल्हा परिषद, प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR