छत्रपती संभाजीनगर : प्रतिनिधी
करडीचे उत्पादन कमी आल्याने ऐन हंगामात भाव कमी होण्याऐवजी वाढले आहेत. करडी तेलाने तर आजपर्यंतचे भाववाढीचे सर्व विक्रम मोडीत काढत चक्क २६० रुपये किलोचा दर गाठला आहे.
सर्व खाद्यतेलात सर्वाेत्तम, आरोग्यदायी तेल म्हणजे करडी तेल होय. मात्र, करडी बीच्या उत्पादनाकडे शेतक-यांनी पाठ फिरवली आणि त्याचा मोठा फटका तेल उत्पादनाला बसत आहे. मागील चार ते पाच वर्षांत करडी बीचे प्रमाण सतत कमी होत आहे. परिणामी, करडी तेलाचे भाव गगनाला भिडले आहेत.
करडी बीचा हंगाम महाशिवरात्र ते गुढीपाडव्यापर्यंत असतो. यंदा उत्पादनात ३० टक्क्यांनी घट झाल्याने करडी बी ४५ रुपये किलोहून थेट ६६ रुपये किलोपर्यंत जाऊन पोहोचले आहे. परिणामी, महिनाभरात २० रुपयांनी महागले आहे. करडी तेल आज २४० रुपये लिटर तर किलोमागे २० रुपये वाढ होऊन २६० रुपये किलोपर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे ग्राहकांनी करडी तेल खरेदी करण्यात हात आखडता घेणे सुरू केले आहे.
शेंगदाणा किंवा सूर्यफूल तेलाची विक्री वाढेल
करडी तेलाच्या भावाने उच्चांक गाठल्याने ग्राहकांनी १८० ते १९० रुपये लिटर विक्री होत असलेले शेंगदाणा तेल किंवा १४४ रुपये लिटरप्रमाणे विक्री होत असलेले सूर्यफूल तेल खरेदी करणे पसंत केले आहे.