बंगळुरू : वृत्तसंस्था
कर्नाटकचे माजी पोलिस महासंचालक (डीजीपी) ओम प्रकाश यांची हत्या करण्यात आली आहे. रविवारी (२० एप्रिल) संध्याकाळी बेंगळुरूमधील एचएसआर लेआउटमध्ये ही घटना घडली. त्यांची पत्नी पल्लवीनेच त्यांची हत्या केल्याचे बोलले जात आहे. कौटुंबिक वादातून पत्नीने त्यांची हत्या केल्याची माहिती आहे. या घटनेनंतर पत्नीने स्वत: पोलिसांना याबाबतची माहिती दिली. राज्य पोलिस विभागाचे प्रमुख असलेल्या अधिका-याच्या हत्येने सर्वांनाच धक्का बसला.
६८ वर्षीय ओम प्रकाश निवृत्तीनंतर बेंगळुरूमध्ये त्यांच्या राहत्या घरी राहायचे. त्यांचा पत्नीशी काही कारणावरुन वाद सुरू होता. मानसिक संतुलन बिघडलेल्या पत्नीने रविवारी सायंकाळी ओमप्रकाश यांची हत्या केली आणि त्यानंतर पोलिसांना याबाबत माहिती दिली, अशी माहिती आहे. या प्रकरणी एचएसआर लेआउट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी होसूर रोडवरील सेंट जॉन हॉस्पिटलमध्ये नेण्यात आला आहे.