18.2 C
Latur
Saturday, November 23, 2024
Homeमुख्य बातम्याकर्नाटकात ऑपरेशन ‘कमळ’ची तयारी; कॉँग्रेसचे गौडा यांचा दावा

कर्नाटकात ऑपरेशन ‘कमळ’ची तयारी; कॉँग्रेसचे गौडा यांचा दावा

आमदारांना १०० कोटींची ऑफर

बंगळुरू : वृत्तसंस्था
कर्नाटकातील मांड्या येथील काँग्रेस आमदार रविकुमार गौडा यांनी रविवारी विरोधी पक्ष असलेल्या भाजपवर ‘ऑपरेशन लोटस’च्या तयारीचा आरोप केला आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखालील राज्यातील सरकार अस्थिर करण्यासाठी १०० कोटी रुपयांची ऑफर देऊन काँग्रेस आमदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, एकही आमदार त्याच्या जाळ्यात अडकणार नाही. राज्यातील काँग्रेसचे सरकार स्थिर आणि मजबूत आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

रविकुमार गौडा म्हणाले, मी आजही म्हणत आहे की, त्यांनी (भाजप) आता ५० कोटी रुपयांची ऑफर वाढवून १०० कोटी रुपये केली आहे. परवा कोणी फोन करून १०० कोटी रुपये तयार असल्याचे सांगितले होते. त्यांना ५० आमदार खरेदी करायचे आहेत. भाजपचे लोक ५० कोटींवरून १०० कोटींवर पोहोचले आहेत. ते म्हणाले, मला कुणीतरी फोन केला होता, मी त्याला म्हणालो १०० कोटी रुपये आपल्याकडेच ठेवा. मी ईडीकडे तक्रार करण्याचा विचार केला. ते सातत्याने आमचे सरकार पाडण्याच्या तयारीत आहेत. मात्र आमचे सरकार स्थिर असून मुख्यमंत्रीही मजबूत आहेत.

यापूर्वी, गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यातही गौडा यांनी असाच दावा केला होता. एका चमूने काँग्रेस आमदारांना ५० कोटी रुपये आणि मंत्रिपदाचे आमिष दाखवून आकर्षित करण्याचा प्रयत्न केला होता. ४ आमदारांसोबत संपर्क साधण्यात आला होता. याचे पुरावे आहेत, असा दावा त्यांनी केला होता. गौडा यांनी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस (संघटन) बीएल संतोष, केंद्रीय मंत्री शोभा करंदलाजे, प्रल्हाद जोशी आणि एचडी कुमारस्वामी (जनता दल-सेक्युलर) यांच्यावर आरोप केले होते.

गौडा म्हणाले, राज्यातील काँग्रेस सरकार अस्थिर करण्यासाठी हे लोक एका टोळीच्या स्वरुपात काम करत आहेत. मात्र, १३६ आमदार असलेले काँग्रेस सरकार मजबूत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR