कल्याण : प्रतिनिधी
कल्याण परिसरात मनापाचा हलगर्जीपणा समोर आला आहे. चिकणघर परिसरातील नागरिकांच्या जीवाशी मनपा खेळत असल्याचा आरोप केला जात आहे. चिकणघर परिसरातील नव एव्हरेस्ट सोसायटी परिसरात नागरिकांना दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
या दूषित पाण्याच्या पुरवठ्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
या परिसरातील नागरिकांना उलट्या, ताप, टायफॉईड आणि डायरियासारखे आजार होत आहेत, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पालिकेकडे याबाबत वारंवार तक्रार दाखल करूनही या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष करत असल्याचा स्थानिकांनी आरोप केला आहे. त्यामुळे जीवावर बेतणा-या समस्येबाबत पालिकेने केलेला हलगर्जीपणा पाहता संतापलेल्या नागरिकांनी आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.