18.6 C
Latur
Wednesday, November 27, 2024
Homeमुख्य बातम्याकाँग्रेसच्या उमेदवारांमुळे भाजपचा फायदा, राज्यसभेत बळ वाढणार

काँग्रेसच्या उमेदवारांमुळे भाजपचा फायदा, राज्यसभेत बळ वाढणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने ९९ जागा जिंकत दमदार कामगिरी केली होती. तसेच संख्याबळ वाढल्याने राहुल गांधी यांना लोकसभेचे विरोधी पक्षनेतेपदही मिळाले होते. मात्र लोकसभेत वाढलेल्या संख्याबळाचा आता काँग्रेसला राज्यसभेमध्ये तोटा होताना दिसत आहे. त्याचे कारण म्हणजे काँग्रेसच्या अनेक राज्यसभा सदस्यांनी लोकसभेची निवडणूक लढवली होती. त्यापैकी अनेकांनी विजयही मिळवला. त्यामुळे काँग्रेसचं राज्यसभेतील संख्याबळ घटले आहे.
मात्र रिक्त झालेल्या जागांवर आपण उमेदवार निवडून आणण्यासाठी आवश्यक संख्याबळ नसल्याने या जागांवर आता काँग्रेसचे उमेदवार निवडून येणार नाहीत. तसेच या जागांवर भाजपचे उमेदवार निवडून येण्याची शक्यता अधिक आहे.
राज्यसभेच्या १२ जागांसाठी निवडणूक जाहीर झालेली आहे. तसेच या निवडणुकीच्या संभाव्य निकालाचे चित्रही स्पष्ट झालेले आहे. या जागांवर भाजपच्या उमेदवारांचा विजय निश्चित असल्याने राज्यसभेतील काँग्रेस आणि इंडिया आघाडीचे संख्याबळ घटणार आहे. तसेच भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएचे संख्याबळ वाढणार असून, एनडीएला पहिल्यांदाच राज्यसभेमध्ये बहुमत मिळणार आहे.
नऊ राज्यांमधील राज्यसभेच्या १२ जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीचा आढावा घेतल्यास ही विरोधात उमेदवार नसल्याने निवडणूक बिनविरोध होणार आहे. यामध्ये महाराष्ट्र, बिहार, आसाम येथील प्रत्येकी दोन आणि हरियाणा, राजस्थान, तेलंगाणा, ओडिशा आणि त्रिपुरामधील प्रत्येकी १ अशा १२ जागांचा समावेश आहे. तसेच यापैकी ११ जागांवर बिनविरोध भाजप आणि एनडीएच्या उमेदवारांचा विजय निश्चित आहे. तर तेलंगाणामधील एका जागेवर काँग्रेसचा उमेदवार विजयी होणार आहे.
या १२ जागांसाठीचा निकाल जाहीर झाल्यानंतर भाजपची राज्यसभेतील सदस्यसंख्या ही ८७ वरून वाढून ९७ एवढी होईल. तसेच नियुक्त आणि अपक्ष खासदारांची संख्या जोडल्यास हा आकडा १०४ पर्यंत पोहोचतो. तर एनडीएची सदस्यसंख्या वाढून ११९ एवढी होईल. त्यामुळे २३७ सदस्य असलेल्या सभागृहात एनडीएकडे काठावरचे बहुमत असेल.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR