21.3 C
Latur
Thursday, December 26, 2024
Homeमहाराष्ट्रकामचुकारपणा केल्यास गाठ माझ्याशी!

कामचुकारपणा केल्यास गाठ माझ्याशी!

मुंबई : प्रतिनिधी
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘वित्त व नियोजन’सह ‘राज्य उत्पादन शुल्क’ मंत्रिपदांची सूत्रे हाती घेताच मंत्रालयात दोन्ही विभागांसह शासनातील वरिष्ठ अधिका-यांची बैठक घेऊन वित्त, नियोजन आणि उत्पादनशुल्क विभागाच्या कामकाजाचा आढावा घेतला. मंत्र्यांचे खातेवाटप होताच उपमुख्यमंत्री अजित पवार अ‍ॅक्शन मोडवर आले असून करसंकलन आणि महसूलवाढीच्या प्रक्रियेत सुसूत्रता, सुधारणा आणत ‘रिझल्ट ओरिएंटेड’ काम करण्याचे निर्देश अजित पवारांनी वरिष्ठ अधिका-यांना दिले. अधिका-यांनी पारदर्शक कारभार करावा. करचोरी, करगळती रोखण्याच्या कर्तव्यात हयगय खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा अजित पवार यांनी दिला.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयातील त्यांच्या समिती कक्षात ‘वित्त व नियोजन’ विभागासह ‘राज्य उत्पादन शुल्क’ विभागातील वरिष्ठ अधिका-यांची बैठक घेऊन विभागांचा सविस्तर आढावा घेतला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी प्रलंबित योजना, आवश्यक निधी, तसेच राज्याच्या उत्पन्नाचा आढावा घेतला. या बैठकीत राज्यातील महसुली सुधारणा, शेती विकास, औद्योगिक गुंतवणूक आणि रोजगारनिर्मिती यांसारख्या विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.

शेतक-यांच्या आणि सामान्य नागरिकांच्या कल्याणासाठी वित्तीय योजना आणण्यावर भर देण्याच्या सूचना देत राज्याच्या महसूलवाढीसाठी करचोरी, करगळतीसह गैरकारभार रोखण्याच्या सूचना दिल्या. करसंकलनाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी सर्व सुविधा पुरविण्यात येतील परंतु कामात परिस्थितीत हयगय चालणार नसल्याचे सांगत रिझल्ट ओरिएंटेड काम करण्याच्या सूचना त्यांनी अधिका-यांना दिल्या. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाचा सविस्तर आढावा घेतला. राज्यातील बेकायदा दारूविक्रीवर कडक निर्बंध आणण्यासाठी पारदर्शक व्यवस्था उभारण्याचे निर्देश दिले.

दरम्यान, यावेळी वित्त व नियोजन विभागाचे राज्यमंत्री अ‍ॅड. आशीष जयस्वाल, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओमप्रकाश गुप्ता, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अपर मुख्य सचिव संजय सेठी, वस्तू व सेवा कर विभागाचे राज्य आयुक्त आशीष शर्मा, वित्त विभागाच्या (वित्तीय सुधारणा) सचिव शैलजा ए., लेखा व कोषागारे विभागाचे सचिव डॉ. रामास्वामी एन., राज्य उत्पादन शुल्क विभागाचे उपसचिव रवींद्र औटे, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे सहआयुक्त विश्वनाथ इंदिसे, सहआयुक्त सुनील चव्हाण, अपर आयुक्त यतीन सावंत, उपायुक्त सुभाष बोडखे, उपायुक्त शंकर जगताप आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
सर्वंकष गतिशील आराखडा तयार करा

‘शहरातील रस्त्यांवर सतत होत असलेल्या वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी रस्त्यांची स्थिती सुधारा, रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करा. तसेच, सर्व यंत्रणांच्या मदतीने ‘सर्वंकष गतिशील आराखडा’ (मोबिलिटी प्लॅन) तयार करा,’ अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महापालिकेतील अधिका-यांना केल्या. महापालिकेच्या येणा-या अंदाजपत्रकात रस्त्यांसाठी अधिक तरतूद ठेवावी, असेही पवार यांनी सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR