19.9 C
Latur
Saturday, November 23, 2024
Homeसंपादकीय विशेषकाश्मीरमधील हल्ल्याचा संदेश

काश्मीरमधील हल्ल्याचा संदेश

भारतात नव्या सरकारची स्थापना होत असतानाच जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या मोठ्या दहशतवादी हल्ल्याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. कलम ३७० हटवल्यानंतर दहशतवादात मोठी घट झाली असून दहशतवादी संघटना काही भागात मर्यादित राहिल्याचा दावा केंद्र सरकार करत आहे. पण ज्याप्रकारे दहशतवादी वारंवार घातपाताचे हल्ले करत आहेत, त्यामुळे सरकारपुढे आव्हान निर्माण झाले आहे. दहशतवादी सतत आपली रणनीती बदलताना दिसताहेत. कधी ते सशस्त्र दलांना लक्ष्य करतात, तर कधी बाहेरील काश्मिरी पंडितांना लक्ष्य केले जाते. आता तिथे जाणा-या पर्यटकांवर हल्ले होत आहेत. या हल्ल्याने एकीकडे नव्या सरकारची कोंडी करण्याचा पाकिस्तानचा हेतू दिसतो आहे; तर दुसरीकडे आपल्या गुप्तचर यंत्रणांचे अपयशही समोर आले आहे. कसभा निवडणुकांची प्रक्रिया पार पडून केंद्रामध्ये नव्या सरकारची स्थापना होत असताना म्हणजेच राष्ट्रपती भवनात नरेंद्र मोदी आणि त्यांच्या नवीन मंत्रिमंडळाचा शपथविधी सुरू असताना, जम्मू-काश्मीरच्या रियासी जिल्ह्यात यात्रेकरूंना घेऊन जाणारी ५३ आसनी बस दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर दरीत कोसळली. या बसवर दहशतवाद्यांनी गोळीबार केला.

मुख्यत: उत्तर प्रदेश आणि दिल्ली येथील यात्रेकरूंना घेऊन जाणारी बस खोल दरीत कोसळली, त्यात तीन महिलांसह नऊ जण ठार झाले आणि अन्य ३३ जण गंभीर जखमी झाले. हल्ल्यातून वाचलेल्या एका व्यक्तीने सांगितले, माता वैष्णोदेवीचे दर्शन घेतल्यानंतर परत येताना शिव खोरीपासून चार-पाच किलोमीटरवर आमच्या बसवर गोळीबार झाला. आमची बस दरीत पडल्यानंतरही गोळीबार सुरूच होता. या हल्ल्यात चालकाला गोळी लागली आणि अनेक प्रवासी जखमी झाले. काश्मीरमध्ये २०१७ मध्ये अशाच प्रकारे यात्रेकरूंच्या बसवर दहशतवादी हल्ला झाला होता. त्याच्या आठवणी यामुळे ताज्या झाल्या. या घटनेनंतर काही तासांतच दहशतवाद्यांनी जम्मूच्या डोडा भागातील लष्कराच्या तात्पुरत्या परिचालन तळावर (टीओबी) हल्ला केला, ज्यात पाच लष्करी सैनिक आणि एक विशेष पोलिस अधिकारी जखमी झाले. त्या पाठोपाठ कठुआ जिल्ह्यातील सैदा या गावात दहशतवादी हल्ल्यानंतर पोलिस आणि दहशतवाद्यांमधील चकमकीत केंद्रीय राखीव पोलिस दलाचा एक जवान शहीद झाला.

जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ले रोखणे हे आव्हान कायम आहे. मात्र, कलम ३७० हटवल्यानंतर दहशतवादात मोठी घट झाली असून दहशतवादी संघटना काही भागात मर्यादित राहिल्याचा दावा केंद्र सरकारकडून केला गेला. पण गेल्या वर्षभराच्या काळात ज्याप्रकारे दहशतवादी वारंवार घातपाताचे हल्ले करत आहेत, त्यावरून सरकारी दाव्यावर विश्वास ठेवणे कठीण होत चालले आहे. दहशतवादी सतत आपली रणनीती बदलताना दिसताहेत. कधी ते सशस्त्र दलांना लक्ष्य करतात, तर कधी बाहेरील व्यक्तींना, तर कधी काश्मिरी पंडितांना लक्ष्य करत आहेत. त्यापाठोपाठ आता पर्यटकांवरही हल्ले होत आहेत. गेल्या महिन्यात पहलगाममध्ये पर्यटकांवर हल्ला झाला होता. आता कटरा येथे जाणा-या भाविकांनी भरलेल्या बसला लक्ष्य करण्यात आले. पर्यटन हा काश्मिरी लोकांच्या उपजीविकेचा प्रमुख आधार आहे.

कायदा-सुव्यवस्था अबाधित असणे आणि शांतता असणे ही कोणतेही पर्यटन क्षेत्र विकसित होण्यासाठी, त्याकडे पर्यटकांचा ओढा वाढण्यासाठीची पूर्वअट आहे. साहजिकच अशा हल्ल्यांचा काश्मीरमधील पर्यटनावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. नव्वदच्या दशकात पृथ्वीवरील या नंदनवनात दहशतवादी हिंसाचाराने हलकल्लोळ माजवला होता; पण त्यावेळी पर्यटकांना फारसे लक्ष्य केले जात नव्हते. पण आता पर्यटकांच्या बसला लक्ष्य केल्यामुळे दहशतवाद्यांनी नवी रणनीती अवलंबली आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या दहशतवाद्यांनी जाणूनबुजून बसचालकावर गोळ्या झाडल्या, त्यामुळे बस नियंत्रणाबाहेर जाऊन खड्ड्यात पडली. बस थांबवून गोळीबार करण्याचा दहशतवाद्यांचा हेतू असल्याचा सुरक्षा दलाला संशय आहे. रियासीची ही घटना अनेक प्रश्न निर्माण करणारी आहे. यामागे एक मोठा कट असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे या नव्या दहशतवादी कटाचे सर्व धागेदोरे उलगडणे हे सुरक्षा दल आणि गुप्तचर यंत्रणांपुढे आव्हान असणार आहे.

शपथविधी दिवशी झालेला हा दहशतवादी हल्ला म्हणजे सरकारला थेट आव्हान आहे. त्यामुळे सुरक्षा यंत्रणांनी त्याला चोख प्रत्युत्तर दिले आहे. वास्तविक, वैष्णोदेवी मार्ग सुरक्षित राखण्यासाठी सुरक्षा दलांनी अथक परिश्रम घेतले होते. असे असूनही हा हल्ला करण्यात दहशतवाद्यांना कसे यश आले, या दहशतवादी हल्ल्याबाबत तेथील गुप्तचर विभागाला काही पूर्व माहिती होती का? हे पहावे लागेल. जर कोणतीही गुप्तवार्ता नसेल तर ती बाब आणखी गंभीर आहे. दुसरी गोष्ट म्हणजे काश्मीरमधील महत्त्वाच्या रस्त्यांवर पोलिसांची गस्त कमी झाली आहे का, याबाबतही विचार करायला भाग पाडले आहे. त्याचबरोबर काश्मीरमध्ये एखादा नवा दहशतवादी गट सक्रिय झाला आहे का, याचाही शोध घ्यावा लागणार आहे. देवीच्या दर्शनासाठी येणा-या सर्व पाहुण्यांच्या सुरक्षेसाठी मदत करणे ही वैष्णोदेवीच्या संपूर्ण मार्गावरील स्थानिक लोकांचीही जबाबदारी आहे. त्याअनुषंगाने पोलिसांनी ग्रामसुरक्षा रक्षकांनाही सतर्क केले आहे, मात्र आता पूर्वीपेक्षा अधिक सतर्क राहण्याची वेळ आली आहे.

एका दिवसात सरासरी २५ हजार लोक वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी जातात. या देवीमातेच्या दर्शनासाठी देशभरातूनच नव्हे तर परदेशातूनही भाविक मोठ्या संख्येने येतात. अलीकडच्या काही महिन्यांत जम्मू-काश्मीरमधील वातावरण सुधारले असल्यामुळे, तेथे शांततेचे वारे वाहू लागल्याने पर्यटक आणि भाविकांची संख्या वाढली आहे. वैष्णोदेवी यात्रेच्या निमित्ताने काश्मीरमधील आर्थिक उलाढालही वाढत असते. यातील मोठा हिस्सा स्थानिक लोकांच्या खिशात जातो. त्यातून त्यांची उपजीविकेची सोय होते. परंतु जम्मू-काश्मीरच्या लोकांना पूर्वीप्रमाणेच असहाय्य ठेवण्यासाठी, तसेच अर्थव्यवस्था कमकुवत करण्यासाठी दहशतवाद्यांकडून आणि राष्ट्रविरोधी तत्त्वांकडून अशा प्रकारचा कट रचला जातो. आता सरकारने युद्धपातळीवर पर्यटक आणि भाविकांची आवक कमी होणार नाही आणि स्थानिक अर्थव्यवस्था बळकट होत राहण्याची हमी द्यायला हवी.

पर्यटकांवर हल्ले करण्यामागे दहशतवादी संघटनांचा उद्देश खो-याबाहेरून येणा-या लोकांची ये-जा थांबवणे हा आहे. दहशतवाद्यांना लोकांमध्ये भीती निर्माण करायची असल्याचे या हल्ल्यांवरून स्पष्ट झाले आहे. मात्र याबाबत स्थानिकांमध्ये कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त होत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. गेल्या दहा वर्षांत नि:संशयपणे दगडफेक, आंदोलन इत्यादी घटना कमी झाल्या आहेत, दहशतवादी हल्ल्यातील मृत्यूचे प्रमाणही कमी झाले आहे. परंतु दहा वर्षांपूर्वीच्या आणि त्यानंतरच्या आकडेवारीची तुलना केल्यास दहशतवादी हल्ले वाढल्याचे स्पष्टपणे दिसून येते. मोठ्या प्रमाणात दहशतवादी मारले गेले असले तरी दुस-या बाजूला दहशतवाद्यांची भरतीही वाढली आहे. त्याला स्थानिक लोकांचा पाठिंबा वाढला आहे. त्यामुळेच भारतीय लष्कराने सीमेवर सतर्कता वाढवली असून शोधमोहीम तीव्र करण्यात आली आहे. दहशतवाद्यांना मिळणा-या आर्थिक पाठिंब्यावर कडक नजर ठेवली जात असूनही त्यांना आपले षड्यंत्र यशस्वी करण्यात कसे यश मिळत आहे, याचा विचार करावा लागेल.

नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीच्या अहवालानुसार अशा हल्ल्यांमध्ये पाकिस्तानचे प्रशिक्षित दहशतवादी सामील असतात आणि स्थानिक लोक त्यांना माहिती देतात. वास्तविक, कमल ३७० आणि ३५ अ हटवल्यानंतर काश्मीरमधून दहशतवाद्यांना मिळणारा स्थानिकांचा पाठिंबा कमी झाल्याचे दिसले होते. पण आता वाढत्या दहशतवादी कारवायांमधून जर तो वाढत असल्याचे निदर्शनास आले तर ती धोक्याची घंटा असेल. येणा-या काळात जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. लोकसभा निवडणुकांची प्रक्रिया शांततेत पार पाडण्यात आलेले यश आणि जवळपास ६० टक्क्यांहून अधिक झालेले मतदान यामुळे पाकिस्तानला सणसणीत चपराक बसली आहे.

त्यामुळेच विधानसभा निवडणुकांपूर्वी येथे अशांतता पसरवली जाण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न असल्याचे स्पष्ट होत आहे. मध्यंतरी, नवाज शरीफ यांनी भारताशी चर्चा करण्यास तयारी असल्याचे विधान केल्यानंतर आपल्याकडील अनेकांनी भारताने याबाबत सकारात्मकता दर्शवली पाहिजे असा सूर आळवण्यास सुरुवात केली होती. परंतु पाकिस्तानची कथनी आणि करणी यामध्ये नेहमीच फरक असतो. विशेषत: एकीकडे चर्चेसाठीचा प्रस्ताव ठेवायचा आणि दुसरीकडे दहशतवादी हल्ले करायचे हे धोरण पाकिस्तान वर्षानुवर्षे अवलंबत आला आहे. त्यामुळेच मोदी सरकारने ‘टेरर अँड टॉक’ एकत्र चालणार नाही, असे खडसावत पाकिस्तानशी संबंध खंडित केले आणि सुरक्षा व्यवस्था अधिक भक्कम करण्यावर भर दिला. त्याला यशही आले. परंतु ताज्या हल्ल्यांनी पुन्हा एकदा सुरक्षा यंत्रणांपुढे आव्हान उभे केले आहे. त्याचा निकराने सामना करून दहशतवाद्यांना बंदोबस्त करावा लागेल.

-ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त)

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR