मॉस्को : वृत्तसंस्था
युक्रेन आणि रशिया यांच्यात गेल्या अनेक महिन्यांपासून युद्ध सुरु आहे. बलाढ्य रशियासमोर युक्रेनने अजूनही गुडघे टेकलेले नाहीत. युक्रेनला अमेरिका आणि इतर युरोपीयन देशांकडून मदत मिळते. पण या युद्धात रशिया तरी अजून वरचढ ठरला आहे. या युद्धात अमेरिकेसह नाटो देश रशियाच्या विरोधात उभे राहिले आहेत. रशियाला एकटा पाडण्याचे प्रयत्न सुरु आहेत. पण पुतीन काही कमी नाहीत. युद्धात इंधन आणि पाणी कसे मिळवावे हे त्यांना चांगले माहित आहे. यामुळेच त्यांनी अमेरिकेच्या शत्रूंसोबतची मैत्री वाढवली आहे. उत्तर कोरियाकडून सातत्याने शस्त्रे आणि क्षेपणास्त्रांचा पुरवठा होत आहे. उत्तर कोरियाने रशियासोबत असा डाव आखला आहे की, अमेरिकेचे ही टेन्शन वाढले आहे.
उत्तर कोरियाने नवीन तंत्रज्ञानाने सुसज्ज अशा रॉकेट लॉन्चरची हुकूमशहा किम जोंग-उनच्या उपस्थितीत चाचणी घेतली. आता युक्रेनविरुद्धच्या युद्धात तो रशियाला ही नवीन यंत्रणा देऊ शकतो. उत्तर कोरियाचे हे नवे शस्त्र अत्यंत घातक असल्याचे बोलले जाते. उत्तर कोरियाच्या या निर्णयामुळे दक्षिण कोरियाही दहशतीत आहे. कारण हे शस्त्र सेऊल आणि त्याच्या आसपासच्या भागात लक्ष्य श्रेणीमध्ये ठेवता येते.
फेब्रुवारीमध्ये किम जोंग उन म्हणाले होते की, २०२४ ते २०२६ दरम्यान कोरियन पीपल्स आर्मी युनिट्समध्ये शस्त्र प्रणाली तैनात करेल. उत्तर कोरियावर लक्ष ठेवणा-या तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, युक्रेन युद्धात ही तंत्रज्ञान वापरता यावे म्हणून उत्तर कोरियाने ही चाचणी घेतली.
रशियाला उत्तर कोरियाकडून हे नवीन रॉकेट लाँचर मिळाल्यास त्याची ताकद आणखी वाढणार आहे. किम जोंग उन यांनी पुतीन यांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. हे दोन्ही देश अमेरिकेचे कट्टर शत्रू आहेत. दुसरीकडे चीनही रशियाला मदत करत आहे.