लातूर : प्रतिनिधी
शेतक-यांनी मोठ्या प्रमाणात खर्च करून पिकवलेले भाजीपाल्याला बाजारपेठेत मागील काहि दिवसापासून कवडीमोल भाव मिळत असल्यामुळे भाजीपाला फेकून देण्याची वेळ शेतक-यावर आली आहे. पारंपरिक पीक पद्धतीला फाटा देत जिल्ह्यातील अनेक शेतकरी भाजीपाल्याचे उत्पादन घेतात. मात्र, भाजीपाल्याला दर नसल्याने उत्पादक शेतकरी सध्या आर्थिक विवंचनेतून मार्गक्रमण करत असल्याचे चित्र जिल्ह्यात सर्वत्र दिसून येत आहे. त्यामुळे दर मिळत नसल्यामुळे खर्च तर सोडाच गाडी भाडे ही खिशातून देण्याची वेळ सध्या शेतक-यावर येऊन ठेपली आहे
कधी अवकाळी तर कधी मातीमोल बाजारभावामुळे निसर्गाच्या दृष्ट चक्रातून मार्गक्रमण करणा-या बळीराजाला यंदा दोन्ही संकटातून मार्गक्रमण करण्याची वेळ आली आहे. जिल्ह्यातील काही शेतक-यांनी पारंपारिक शेतीला फाटा देत विविध भाजीपाल्याची लागवड केली. त्यामध्ये कोबी, वांगी, टोमॅटो, कोथिंबीर, ककडी यासह आदी पिकांना सध्या बाजारपेठेत कवडीमोल भाव मिळत आहे. त्यामुळे शेतकरी सध्या अस्मानी पाठोपाठ सुलतानी संकटामुळे पुरता आर्थिक व मानसिक दृष्टया संकटात सापडला आहे. सध्या बाजारात कांद्यासह सर्व शेतीमालास दर मिळत नाही. कमी भावात उत्पादन खर्च तर सोडाच मात्र शेतातून बाजारपेठेत नेहण्याचा खर्चही शेतक-यांच्या हातात पडत नाही. त्यामुळे शेतक-यांना सध्या मोठया आर्थिक संकटातून जावे लागत आहे. सध्या भाजीपाला कवडीमोल दर मिळत असल्याने शेतकरयांची आथर्किदृष्टया पिळवणूक होत आहे.
दुसरीकडे व्यवसायिक मात्र हात धूवून घेत करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे. शेतकरी फक्त शेतीवर अवलंबून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत असतात. मुख्यत: लहान मुलांप्रमाणे जपलेला भाजीपाल्याच्या पिकाला डोळयासमोर उध्वस्त होताना शेतकरी हातबल झाल्याचे बघायला मिळत आहे. जिल्ह्यातील अनेक शेतक-यांनी मोठया प्रमाणात भाजीपाल्याचे पीक मोठया प्रमाणात घेतले आहे. भाजीपाला पिकांसाठी हजारो रुपये खर्च करून उत्पादन घेतले जाते. मात्र आज भाजीपाला फेकण्याची वेळ शेतक-यावर येवून ठेपलेली दिसून येत आहे.
टोमॅटोला एका एकरातील पिकांसाठी साधारणता पन्नास हजार रुपयांचा खर्च करावा लागतो. त्यामुळे तोडण्यासाठी मजुरी सुद्धा दिवसेंदिवस वाढत आहे. परंतु घातलेला खर्चही भरून काढणे कठीण झाले आहे त्यामुळे शासनाने शेतक-यांना हमीभाव द्यावा. अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. पिकांचा काढण्याचा खर्च गाडी भाडे सुद्धा निघत नसल्यामुळे तूर्तास बळीराजा हवालदिल झाला आहे. उन्हाळयाच्या दिवसांमध्ये कोथिंबीरला सुद्धा चांगली मागणी असते. परंतु यावर्षी मोठया प्रमाणात कोथिंबीर बाजारात येत असल्याने तिचे भाव घसरल्याचे दिसून येत आहे.
शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या काहि दिवसापासून भाजीपाल्याची आवक वाढत चालली आहे. त्यामुळे बाजारात गवार, मिरची याचे भाव वगळता आदी भाजीपाल्याचे भाव कवडिमोल झालेले दिसून येत आहे. मात्र दुसरीकडे गवार, मिरची याचे भाव तेजीत आले आहे. शहरातील किरकोळ बाजारात गवार १०० रूपये तर मिरची १२० रूपये, भेंडी ८० रूपये, कारले ८० रूपये प्रति किलोने विक्री केली जात आहे.