27.4 C
Latur
Sunday, September 22, 2024
Homeनांदेडकेमिकल पिल्याने ३३ मेंढ्यांचा जागीच मृत्यू

केमिकल पिल्याने ३३ मेंढ्यांचा जागीच मृत्यू

अर्धापूर : प्रतिनिधी
अधार्पूर – नांदेड राष्ट्रीय महामार्गावरील दाभड पाटीनजीक रस्त्याने जाणा-या मेंढरांनी पाणी समजून वाहनात भरण्यात येणारे रसायन (युरिया मिस्कीड लिक्विड) मिश्रीत पाणी पिल्याने ३३ मेंढ्याचा जागीच मृत्यू झाला. यात दोन मेंढपाळाचे जवळपास पाच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. ही घटना दि. १२ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेपाचच्या दरम्यान घडली. या प्रकरणी केमीकल विक्रेत्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.

अर्धापूर तालुक्यातील देगाव (कु.) येथील मेंढपाळ रामकिशन भुजाजी बेळगे व योगेश मारोती वटे हे आपल्या जवळपास ३०० च्या वर मेंढ्या चारून दुपारी चार वाजताच्या सुमारास मुक्कामाच्या स्थळी घेऊन जात होते. त्याच दरम्यान अर्धापूर -नांदेड महामार्गावरील दाभड शिवारात असलेल्या डी. एफ. केमिकल विक्रेत्यामार्फत प्रदूषण होऊ नये म्हणून रस्त्यावर ठेवण्यात आलेले युरिया मिक्सिड लिक्विड हे वाहनामध्ये भरले जाते. ते टाकीत भरत असताना दुकानापुढे रस्त्याच्या कडेला जमिनीवर पडलेल्या खड्ड्यात सांडले होते. हेच लिक्विड यातील ३३ मेंढरांनी पाणी समजून पिले. केमिकल मिश्रीत पाणी पिलेली मेंढरं पंधरा ते वीस फूट पुढे चालल्यानंतर एका पाठोपाठ एक मेंढ्या मरत गेल्या. यात रामकीशन भुजाजी बेळगे यांच्या २० मेंढ्या तर योगेश मारोती वटे यांच्या १३ मेंढ्या अशा एकूण ३३ मेंढ्या मृत पावल्या. यात एक मेंढी साधारणपणे १५ हजार रुपये किंमतीची असून एकूण पाच लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे मेंढपाळ यांनी सांगितले.

या घटनेची माहिती मिळताच अर्धापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक चंद्रशेखर कदम आणि पोलीस कर्मचारी घटनास्थळी धावले. या दरम्यान संबधित केमिकल विक्रेत्यांनी येथून पलायन केले होते. मात्र या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून केमिकल विक्रेत्यावर कडक कारवाई करून नुकसानग्रस्त मेंढपाळांना तात्काळ नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष भगवान कदम व येथील गावक-यांनी केली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR