22.1 C
Latur
Friday, December 27, 2024
Homeपरभणीकेशवराज बाबासाहेब महाराज यात्रेचे आयोजन

केशवराज बाबासाहेब महाराज यात्रेचे आयोजन

सेलू : शिर्डीचे संत साईबाबांचे सद्गुरू व शहराचे ग्रामदैवत असलेल्या केशवराज बाबासाहेब महाराजांचा यात्रा महोत्सव दि. ८ डिसेंबर पासून सुरू होत आहे. दि.८ ते १६ डिसेंबर या कालावधीत मोठ्या उत्साहात साज-या होणा-या यात्रा महोत्सवात दररोज श्रीच्या मूर्तीस लघुरुद्र व पवमान अभिषेक, अखंड हरिनाम सप्ताह, श्री गुरुचरित्र पारायण, हरिपाठ, महिला मंडळाचे भजन, कीर्तन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

नादविहार संगीत परिवार सेलू यांच्या वतीने अखंड विष्णुसहस्रनाम सप्ताह तसेच विवेक वसंत मंडलिक व गोविंद वसंत मंडलिक यांचे शुक्ल यजुर्वेद संहिता पारायण तर वेशास सारंग रामचंद्र सराफ व वेशास ओंकार नर्सिकर यांचे ऋग्वेद शाकल संहिता पारायण होणार आहेत. दि.८ ते १४ डिसेंबर या कालावधीत भागवताचार्य नंदकिशोर महाराज गोंदीकर यांच्या श्रीमद भागवत कथेचे निरूपण ११ ते ४ या वेळेत होणार आहे. दररोज रात्री ९ वाजता हभप बालासाहेब महाराज नेब (समर्थ जांब) यांचे सुश्राव्य कीर्तन होणार आहे. दि.११ डिसेंबर रोजी केशवराज बाबासाहेब महाराजांची पुण्यतिथी असल्यामुळे सकाळी ७ ते ९ या वेळेत केशवराज बाबासाहेब महाराजांच्या ओवीबद्ध चरित्राचे सामूहिक ३ पाठ होणार आहेत. ९ वाजता श्रीमद भगवत गीतेचे संपूर्ण १८ अध्याय पठन व सायंकाळी श्रींचि आराधना, अभिषेक व महापूजा होणार आहे.

तसेच रात्रौ ९ वाजता केशवराज बाबासाहेबांच्या चरित्रावर रेडिओ स्टार हभप वसंतबुवा मंडलिक यांचे कीर्तन होणार आहे. दि.१२ व १३ डिसेंबर राजी रात्री ९ वाजता परभणी येथील हभप शंकर महाराज आजेगावकर, दि.१४ रोजी श्रीमद भागवत कथेची समाप्ती होणार असून दुपारी माजी जी प सभापती अशोकराव काकडे यांच्या वतीने भंडा-याचे आयोजन करण्यात आले आहे. रात्रौ ९ वाजता माऊलीच्या दिंडीतील मानकरी हभप पुरुषोत्तम महाराज वालुरकर यांचे श्री हरी कीर्तन होणार आहे. दि.१५ डिसेंबर हा या यात्रा महोत्सवाचा मुख्य दिवस असून दुपारी १२ वाजता श्रीची महाआरती, तीर्थ प्रसाद व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी ३ वाजता श्रीची भव्य पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे. दि.१६ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजता भागवतकार व कीर्तन सम्राट हभप सुनील महाराज आष्टीकर यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे.

या यात्रामहोत्सवात सेलूतील महिला व पुरुष भजनी मंडळ तसेच मृदंगाचार्य विठ्ठल काळे, सदाशिव समेळ, बाबासाहेब खुपसेकर, भास्कर डासाळकर, सुधाकर शिंदे तबला वादक केदार तांबट उपस्थित राहणार आहेत. संवादिनी साथ वेशास नागनाथराव विडोळीकर, हभप वसंतबुवा मंडलिक तर गंगाधर कान्हेकर हे देणार आहेत. या महोत्सवात लघरुद्र अभिषेक करू इच्छिणा-यांनी वामन मंडलिक यांचेशी संपर्क साधण्याचे कळवण्यात आले आहे. या यात्रा महोत्सवात शहरातील व परिसरातील भाविक भक्तांनी सर्व कार्यक्रमास उपस्थित राहून दर्शनाचा, श्रवणाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन केशव, वामन व पुरुषोत्तराम मंडलिक यांनी तसेच व्यापारी मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR