रत्नागिरी : रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेने ( ठाकरे गट ) माजी आमदार सुरेंद्र ऊर्फ बाळ माने यांना उमेदवारी दिली होती. पण, बाळ मानेंनी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी निवडणुकीतून माघार घेतली आहे. बाळ मानेंनी अर्ज मागे घेतल्याने महायुतीचे उमेदवार अनिकेत तटकरे यांच्या बिनविरोधाचा मार्ग मोकळा झाला आहे. बाळ माने अर्ज मागे घेताना रत्नागिरी-सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे हे देखील उपस्थित असल्याने भुवया उंचावल्या होत्या.
माध्यमांशी बोलताना बाळ माने म्हणाले, ‘‘रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग मतदारसंघातील १०१८ मतदारांना मी भेटण्याचा प्रयत्न केला. पण, अनेकजण तीर्थयात्रेला गेल्याचे माझ्या लक्षात आले. मी चार अर्ज दाखल केले होते. एका अर्जाला चार सूचक लागतात. शिवसेना ठाकरे गटाचे ५५ जिल्हा परिषद सदस्य होते, त्यातील ४० सह्या मिळाल्या. महाविकास आघाडीतील इतर घटक पक्षांना सूचक म्हणून सह्या देण्याची विनंती केली होती. मी अनेकवेळा मागणी करून मला सह्या मिळाल्या नाहीत.
माझ्या पक्षाच्या सगळ्या सदस्यांनी सह्या दिल्या होत्या. हा सगळा घोडेबाजार सुरू झाल्याच्या काही गोष्टी कानावर आल्या होत्या. घोडेबाजार करून निवडणुका लढवणे हे कोकणाच्या संस्कृतीच्या हिताचे नाही. त्यामुळे मी माझा उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. माझे पक्षातील वरिष्ठांशी बोलणे झाले आहे, असे बाळ मानेंनी स्पष्ट केले.
आता भाजपच्या दिशेने तुमची वाटचाल असणार का? असा प्रश्न विचारल्यावर बाळ मानेंनी म्हटले, ‘‘माझी वाटचाल रत्नागिरीकडे आहे. आजचा विषय हा निवडणुकीची उमेदवारी मागे घेण्यापुरता आहे. तसे काही असेल तर मी तुम्हाला सांगेन. राजकारणात जर आणि तरला अर्थ नसतो. मी १०० टक्के राजकारण केले असते, तर गुवाहाटीला गेलो असतो.’’
नितेश राणे म्हणाले, ‘‘देवेंद्र फडणवीस हे ज्यापद्धतीने राज्यात काम करत आहेत; त्यामुळे सबकुछ देवाभाऊ अशीच परिस्थिती आहे. सगळ्या पक्षातील कार्यकर्त्यांना हे कळलंय की, राज्याला पुढे घेऊन जायचं असेल तर देवेंद्र फडणवीसांशिवाय पर्याय नाही. बाळ माने हे अनुभवी आणि आमदार राहिलेले आहेत. वरिष्ठ पातळीवर ठरलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे काम कार्यकर्ता म्हणून मी करतोय. महायुतीचा प्रतिनिधी म्हणून मी बाळ मानेंसोबत आलोय. महायुतीच्या वरिष्ठ पातळीवरील नेत्यांचा मान ठेवून आणि राजकीय परिस्थिती पाहून बाळ मानेंनी निर्णय घेतला आहे.’’
















