मुंबई : प्रतिनिधी
सोलापूर जिल्ह्यातील शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख आणि माजी मंत्र्यांची शिवसेना उबाठा पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. शिवसेना ठाकरे गटाच्या मध्यवर्ती कार्यालयातून याबाबतचे आदेश जारी करण्यात आले. ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख आणि विधानसभा उमेदवार अमर पाटील, सहसंपर्क प्रमुख आणि माजी मंत्री उत्तमप्रकाश खंदारे यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. विशेष म्हणजे अमर पाटील आणि उत्तमप्रकाश खंदारे हे शिवसेना शिंदे गटाच्या वाटेवर असून उद्याच शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.
विधानसभा निवडणुकीदरम्यान शिवसेनेकडून अमर पाटील यांना दक्षिण सोलापूरमधून तिकीट दिल्यानंतर महाविकास आघाडीत काही काळ बिघाडी झाली होती. विधानसभा निवडणुकीत अमर पाटील यांचा दारुण पराभव झाला. त्यानंतर आता ते ठाकरेंची साथ सोडून शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करत आहेत. शिवसेनेचे हे पदाधिकारी उद्या मुंबईत शिवसेना शिंदे गटात पक्ष प्रवेश करण्यापूर्वीच ठाकरे गटाने त्यांची हकालपट्टी केली तर उत्तम प्रकाश खंदारे हे राज्यमंत्री आणि दोन वेळा शिवसेनेचे माजी आमदार राहिले आहेत.