31.2 C
Latur
Friday, February 7, 2025
Homeराष्ट्रीयखाद्यपदार्थ डिलेव्हरीच्या दरवर्षी ५ लाख तक्रारी

खाद्यपदार्थ डिलेव्हरीच्या दरवर्षी ५ लाख तक्रारी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणने ऑनलाइन काम करणा-या फूड बिझनेस ऑपरेटरना काही सूचना दिल्या आहेत. फूड बिझनेस ऑपरेटर्सनी फक्त तेच खाद्यपदार्थ ग्राहकांपर्यंत पोहोचवावेत, ज्यांचे शेल्फ लाइफ म्हणजेच एक्सपायरी डेट किमान ४५ दिवस आहे. जर एक्सपायरी डेट ४५ दिवसांपेक्षा कमी असेल तर त्याची डिलिव्हरी करू नका, असे फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स अथॉरिटी ऑफ इंडियाने (एफएसएसएआय) म्हटले आहे. खाद्य व्यवसाय करणा-यांनी लेबलिंग आणि डिस्प्ले नियमांचे पालन करावे, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. यासंदर्भात दरवर्षी ५ लाखांवर तक्रारी येत असतात. हे प्रमाण पाहता डिलिव्हरीच्या बाबतीत काळजी घेणे तितकेच महत्त्वाचे आहे.

ऑनलाइन खाद्यपदार्थ ऑर्डर करत असाल तर ऑर्डर केलेले अन्न खाण्यासाठी योग्य आहे, हे तपासले पाहिजे. जर त्या खाद्यपदार्थाची एक्सपायरी डेट ४५ दिवसांपेक्षा कमी असेल तर ती स्वीकारू नका. तसेच त्या बाबतची तक्रार भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाकडे नोंदवू शकता, असेही एफएसएसएआयने म्हटले आहे. त्यामुळे खाद्य पदार्थांची ऑर्डर देताना याची काळजी घेतली पाहिजे. ब-याच एक्सपायरी डेटचा विचार न करता पुढे आणखी चालू शकते, असे सांगून ब-याच पदार्थांची डिलेव्हरी केली जाते. त्यामुळे ग्राहकांनी ही नियमावली लक्षात घेऊन डिलेव्हरी स्वीकारावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.

आकडेवारीवरून असे दिसून येते की, सध्या देशभरात ग्राहक न्यायालयांमध्ये यासंबंधी दरवर्षी ५ लाखांहून अधिक तक्रारी दाखल केल्या जातात. परंतु यातील अनेक प्रकरणे विविध कारणांमुळे प्रलंबित राहत असल्याचे चित्र आहे. अलिकडे खाद्य पदार्थ ऑनलाईन मागविण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे आता असे खाद्यपदार्थ मागवताना विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. विशेषत: एक्स्पायरी डेट तपासूनच ग्राहकांनी डिलेव्हरी स्वीकारणे गरजेचे आहे. याची काळजी खुद्द ग्राहकांनीच घेतली पाहिजे, असे एफएसएसएआयने म्हटले आहे.

ई-जागृती पोर्टलद्वारे प्रकरणे
निकाली काढणे सोपे
ई-जागृती पोर्टलमुळे ग्राहक न्यायालयांसमोर असलेली प्रकरणे निकाली काढणे सोपे होणार असून त्यामुळे ग्राहक त्यांच्या हक्कांबाबत सजग होतील. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणने ऑनलाइन काम करणा-या फूड बिझनेस ऑपरेटर्सना फक्त तेच खाद्यपदार्थ वितरीत करण्यास सांगितले आहे, ज्यांची शेल्फ लाइफ म्हणजेच एक्सपायरी डेट किमान ४५ दिवस आहे. त्यामुळे डिलेव्हरी करतानादेखील याची काळजी घेतली पाहिजे अन्यथा अशा लोकांना कारवाईला सामोरे जावे लागू शकते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR