लातूर : प्रतिनिधी
विरोधकांच्या प्रचारात गेल्या १०-१५ वर्षांत एकच सातत्य दिसत आहे. ‘खोटं बोल पण रेटून बोल’ हे एकच काम ते अत्यंत प्रामाणिकपणे करतात. त्यांच्याकडे बोलायला दुसरा मुद्दाच नाही, असा टोला लातूर ग्रामीणचे काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार धिरज विलासराव देशमुख यांनी भाजपला लगावला.
लातूर तालुक्यातील बोरी येथे आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते. त्यांनी बोरी गाव आणि परिसरातील मतदारांचे आभार मानले. यावेळी बोरी गावातील दगडुसाहेब पडिले, विलास भालके, सुनील पडिले, अनुप शेळके, प्रताप पडिले, बादल शेख, उमेश बेद्रे, सचिन दाताळ, शब्बीर पहलवान, बालाजी कुटवाडे, मधुकर शिंदे, जब्बार सगरे, फरमान शेख, शंकर पाटील (उपसरपंच), सरवर शेख, पपन पाटील, विलास कदम, शालिक थोरमोटे, नानासाहेब पाटील, नानासाहेब पाटील, कमलाकर अनंतवाड, विजय भालके, बाशिद कुरेशी, टिपू चाऊस, दिनेश ढोबळे, शिवशंकर स्वामी, अशोक केसकर, सुभाष भंडे, यशवंत कदम आदि कार्यकर्ते पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्यने उपस्थित होते.
आमदार धिरज देशमुख पुढे म्हणाले, मागील पाच वर्षांत आपण बोरी गावासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी दिला. जिल्हा परिषद गटातील १६ गावांमध्ये २२९ कामे आपण केली. शाळा, पाझर तलाव, दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत कामे, अल्पसंख्याक निधीतून भरपूर कामे केलीत. महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यावर महिलांना दर महिना ३ हजार रुपये, मोफत बससेवा, युवकांना ४ हजार रुपये भत्ता, नोकर भरती सुरु करणे यासह राज्याला पहिल्या क्रमांकाचे राज्य करण्यासाठी महाविकास आघाडीचे सरकार काम करणार आहे. नियमित कर्ज भरणा-या शेतक-यांचे तीन लाखांपर्यंतचे कर्ज माफ करणार आहोत. सोयाबीनला ७ हजार रुपये दर हवा असेल तर महाविकास आघाडीला निवडून द्या, असे आवाहन आमदार धिरज देशमुख यांनी यावेळी केले.