22.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रगडकरी भाजपचे स्टार प्रचारक?

गडकरी भाजपचे स्टार प्रचारक?

महाराष्ट्र पिंजून काढणार, ४ नेत्यांवर प्रमुख जबाबदारी
मुंबई : प्रतिनिधी
आगामी विधानासभेच्या अनुषंगाने भाजपचे मेगा प्लॅनिंग करण्यात आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. भाजपच्या वतीने पक्षातील ४ दिग्गज नेत्यांवर महत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. यामध्ये नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे आणि रावसाहेब दानवे यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे गडकरी स्टार प्रचारक असतील आणि २० स्टार प्रचारकांची व्यवस्थापन समिती स्थापन होणार असून, याचे प्रमुख संयोजक रावसाहेब दानवे असतील, असे सांगितले जात आहे.

२० स्टार प्रचारकांच्या समितीत अशोक चव्हाण, नारायण राणे, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, रवींद्र चव्हाण, राधाकृष्ण विखे पाटील, पंकजा मुंडे, विजया रहाटकर, प्रवीण दरेकर, भाई गिरकर, अशोक नेते, अतुल सावे, संजय कुटे, जयकुमार रावल, रक्षा खडसे, मुरलीधर मोहोळ यांचा समावेश असणार आहे. दुसरीकडे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे विशेष प्रचारक म्हणून एक महिना संपूर्ण महाराष्ट्र पालथा घालणार असल्याचेही बोलले जात आहे.

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत देश आणि राज्य पातळीवर भाजपला चांगलाच धक्का बसला आहे. राज्यातील एकूण ४८ लोकसभा मतदारसंघांपैकी भाजपप्रणित महायुतीला अवघ्या १७ जागांवर विजय मिळाला तर महाविकास आघाडीची ३० जागांवर सरशी झाली. या निकालाने महायुती आणि भाजपचे नेते प्रचंड अस्वस्थ झाले असल्याचेही बघायला मिळाले. लोकसभेचा हाच ट्रेंड आगामी विधानसभा निवडणुकीत कायम राहिला तर कदाचित महायुतीची सत्ता जाणे अटळ असल्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपने जोरदार प्लॅनिंग सुरू केले आहे.

विदर्भातही भाजपला धक्का
विदर्भात काँग्रेसने घरवापसी करत दहापैकी ७ ठिकाणी महाविकास आघाडीला यश मिळवून दिले आहे तर भाजप २ आणि शिंदेच्या शिवसेनेला अवघ्या १ ठिकाणी महायुतीला यश आले. त्यामुळे विदर्भासह राज्यातील सर्व जागांवर भाजपकडून विशेष मंथन करण्यात येत असून त्या अनुषंगाने भाजप तयारीला लागले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR