29.1 C
Latur
Tuesday, June 10, 2025
Homeमहाराष्ट्रगिळंकृत करू पाहणा-या अदानीला राज्य सरकारची मदत

गिळंकृत करू पाहणा-या अदानीला राज्य सरकारची मदत

मुंबई : प्रतिनिधी
कुर्ला मदर डेअरीची जागा अखेर धारावी पुनर्वसनासाठी अदानी समूहाला देण्याच्या विरोधात खासदार वर्षा गायवाड यांच्या नेतृत्वाखाली रविवारी कुर्ला परिसरात निषेध मार्चा काढला. अभ्युदय बँक चौकापासून मदर डेअरीच्या जागेपर्यंत या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, पोलिसांनी परवानगी नाकारल्यामुळे मुख्य चौकातच निदर्शन करून हे आंदोलन आटोपते घेण्यात आले.

या आंदोलनात काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड आणि आमदार ज्योती गायकवाड काँग्रेस कार्यकर्त्यांसह सहभागी झाल्या होत्या. मुंबई पोलिसांनी मुख्य चौकाच्या परिसरात बॅरेकेडिंग करून बंद केल्याने मोर्चा पुढे जाऊ शकला नाही. त्यामुळे आंदोलकांनी तिथे बसून प्रदर्शन केले. मुंबई गिळंकृत करू पाहणा-या अदानीला सर्वत्र विरोध असतानाही राज्य सरकार सर्वतोपरी मदत करत असल्याचा आरोप यावेळी वर्षा गायकवाड यांनी केला. धारावीकरांचे पुनर्वसन आहे त्याच ठिकाणी होणार आहे. मग मुंबईभर अदानीला जागा देण्याचे कारण काय? असा सवाल करत वर्षा गायकवाड यांनी विरोध करणा-या स्थानिकांच्या पाठीशी उभे राहू, असे म्हणत आंदोलनाचा इशारा दिला आहे.

मदर डेअरीच्या जागेबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब :
कुर्ल्यातील मदर डेअरीची जागा धारावी प्रकल्पाला देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. कुर्ल्यातील जवळपास ८ हेक्टरची जागा धारावी पुनर्विकासाच्या नावाखाली अदानी समूहाला देण्यात येऊ नये, याकरता सत्ताधारी शिवसेनेचे स्थानिक आमदार मंगेश कुडाळकर, काँग्रेसच्या विद्यमान खासदार वर्षा गायकवाड यांच्यासह स्थानिकांनी स्थापन केलेल्या समितीनेही अनेक आंदोलने, मानवी साखळ्यांद्वारे निषेध दर्शवला होता. मात्र, या विरोधाला न जुमानता महायुती सरकारने मदर डेअरीची जागा अदानी समूहाला देण्याचा निर्णय घेतला.

जागा देण्याचा निर्णय आधीपासूनच ठरलेला
धारावी पुनर्विकास प्रकल्पात धारावीकरांचे स्थलांतर करणे क्रमप्राप्त होते. त्यादृष्टीने मुंबईतील मुलुंड, देवनारप्रमाणेच कुर्ला येथील मदर डेअरीची जागाही महत्त्वाची मानली जात होती. ही जागा आपल्याला या प्रकल्पात दिली जावी, अशी मागणी अदानी समूहाकडून करण्यात आली होती. ही मागणी राज्य सरकारने मान्य केली आहे. धारावीतील लोकांच्या स्थलांतरासाठी मदर डेअरी, देवनार डम्पिंग ग्राऊंड, मालाडसह मुलुंडमधील भूखंडाची मागणी करण्यात आली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR