39.6 C
Latur
Thursday, April 25, 2024
Homeसोलापूरगुंडगिरी करणारे दोघे दोन वर्षांसाठी तडीपार

गुंडगिरी करणारे दोघे दोन वर्षांसाठी तडीपार

सोलापूर : होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने गुंडागर्दी करून शहरात शांततेला धोकादायक ठरणाऱ्या दोघांना पोलिस आयुक्तालयाकडून दोन वर्षांसाठी सोलापूर व धाराशिव जिल्ह्यातून हद्दपार करण्याचा आदेश मंगळवारी बजावण्यात आला. शुभम सिद्धाराम गायकवाड (वय २९, सुंदरमनगर, विजापूर रोड सोलापूर) व रेहान उर्फ रियाज शहाजहान मकानदार (वय- २७, रा. समाधान नगर, अक्कलकट रोड, सोलापूर) अशी या दोघांची नावे आहेत.

यातील शुभम गायकवाड याच्याविरुद्ध विजापूर नाका पोलिस ठाण्यात गुंडगिरी करणे, शिवीगाळ, दमदाटी, अवैध मटका चालवणे, महिलांशी लज्जास्पद वर्तन करणे अशा प्रकारचे ६ गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्याला पोलिसांनी ताब्यात घेऊन सोलापूर शहर, जिल्हा व धाराशिव जिल्ह्यातून तडीपार करण्याचा आदेश बजावला. यानंतर त्याला तळेगाव दाभाडे चाकण रोड, पुणे येथे सोडण्यात आले.

दुसरा तडीपार आरोपी रेहान ऊर्फ रियाज मकानदार याच्याविरुद्ध २०२२ ते २०२३ या कालावधीत सामान्य नागरिकांना दमदाटी करून त्यांच्याकडून जबरदस्तीने पैसे काढून घेणे, शिवीगाळ व मारहाण करून जखमी करणे, यांसारखे गुन्हे दाखल असल्याने एमआयडीसी पोलिसांकडून तडीपारीचा प्रस्ताव पोलिस उपायुक्तांकडे पाठवण्यात आला होता. तडीपारीचा आदेश झाल्यानंतर त्याला कर्नाटकातील विजयपूर हद्दीत सोडण्यात आले.

ही कारवाई पोलिस आयुक्त एम राज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपायुक्त विजय कबाडे, सहा. पोलिस आयुक्त अजय परमार, विजापूर नाका पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दादा गायकवाड, दुय्यम पोलिस निरीक्षक संगीता पाटील, सपोनि शीतलकुमार गायकवाड, पोलिस रमेश कोर्सेगाव यांनी केली.

दोन्ही आरोपीविरुद्ध महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९५१ चे कलम ५६ (१) (अ), १(ब) प्रमाणे पोलिस उपायुक्त विजय कबाडे यांचे आदेश पारित झाले होते. त्यानुसार तडीपार कारवाई करण्यात आली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR