लातूर : प्रतिनिधी
उच्च शिक्षणातील आयटी क्षेत्रातही आता गुणवत्तापूर्ण संशोधन होण्यास सुरुवात झाली आहे. अशा संशोधनातून देशाच्या विकासाला हातभार लागण्यास मदत होते, असे प्रतिपादन नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे संगणकशास्त्र व अभ्यासमंडळाचे प्रमुख डॉ. सुधीर जगताप यांनी केले.
येथील कॉक्सिट महाविद्यालयात ‘मशीन लर्निंग अँड डेटा सायन्स’ या विषयावरील दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रॉयल एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. एम. आर. पाटील होते. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून बिदरचे प्रा. डॉ. मल्लिकार्जुन हंगरगे, बंगळुरुच्या जैन विद्यापीठाचे डॉ. एस. एम. चव्हाण, कॉक्सिटचे प्राचार्य डॉ. एन. एस. झुल्पे, तज्ज्ञ संचालक एन. डी. जगताप, उपप्राचार्य डॉ. डी. आर. सोमवंशी, डॉ. डी. एच. महामुनी, ट्रेनिंग व प्लेसमेंट प्रमुख प्रा. कैलास जाधव उपस्थित होते. यावेळी डॉ. सुधीर जगताप म्हणाले, डॉ. एम. आर. पाटील हे माझे आदर्श आहेत. त्यांनी मागील २५ वर्षांपूर्वी देशासाठी नवख्या असणार्या संगणकशास्त्रासारख्या विषयातील शिक्षण क्षेत्रात पाऊल ठेवले. आज कॉक्सिटने देशभरातील संगणकशास्त्राखच्या शिक्षणात नावलौकिक मिळविला आहे. कॉक्सिटचे नाव आदरपूर्वक घेतले जात आहे. यामुळे डॉ. एम. आर. पाटील हे देशातील संगणकशास्त्र विषयातील पितामह आहेत, असे गौरवोद्गार त्यांनी काढले.
यावेळी मशीन लर्निंग अँड डेटा सायन्स या विषयावर विविध भागातून आलेल्या मान्यवरांनी मार्गदर्शन करून आयटी क्षेत्रातील डेटा सायन्सचे महत्व विषद केले. राष्ट्रीय परिषदेच्या आयोजनाची भूमिका उपपप्राचार्य डॉ. डी. आर. सोमवंशी यांनी सांगितली. प्रास्ताविक प्राचार्य डॉ. एन. एस. झुल्पे यांनी केले. अध्यक्षीय समारोपात डॉ. एम. आर. पाटील यांनी मशीन लर्निंग व डेटा सायन्स या विषयात दर्जेदार संशोधन होण्याची गरज व्यक्त केली. यामुळे देशाच्या विकासाला हातभार लागेल, असे ते म्हणाले.