22.7 C
Latur
Saturday, July 27, 2024
Homeराष्ट्रीयगुरुवारी अंतरिम बजेट, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घोषणांचा पाऊस?

गुरुवारी अंतरिम बजेट, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घोषणांचा पाऊस?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारचा कार्यकाल संपत आल्याने आता उद्या (गुरुवारी) केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन संसदेत अंतरिम बजेट मांडणार आहेत. देशात लवकरच लोकसभा निवडणुकीचे बिगूल वाजणार आहे. त्यामुळे या अंतरिम बजेटमध्ये मतदारांना खूश करण्याच्या दृष्टीने घोषणांचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. विशेषत: युवकांना रोजगाराच्या संधी, महिलांवर सवलतींचा पाऊस, शेतक-यांच्या किसान सन्मान निधीत वाढ यासह प्राप्तीकरात सवलत अशा लोकानुनयाच्या घोषणा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

अंतरिम बजेटमध्ये वित्तीय सुदृढतेला आणखी बळ देतानाच निवडणूकपूर्व महत्त्वाच्या आर्थिक दस्तऐवजांतून, सरकारकडून आर्थिक जाहीरनामा लोकांपुढे ठेवला जाण्याचे कयास आहेत. मनरेगा, शेतकरी, वंचित, गरीब घटकांसाठी योजनांवर अनुदान म्हणून वाढीव तरतूद केली जाऊ शकते. बरोबरीने नवीन तंत्रज्ञानाधारित वित्तीय सेवा क्षेत्र (फिनटेक), नवउद्यमी (स्टार्टअप्स), डिजिटल व्यवहार आदी मोदी सरकारच्या प्राधान्यक्रमांना प्रोत्साहन दिसेल. डिजिटल सार्वजनिक सुविधा, वित्तीय समावेशकता यांना चालना देणारी काही कर-प्रोत्साहने दिली जातील.

यासोबतच शून्य कार्बन उत्सर्जनाच्या उद्दिष्टानुरूप, विद्युत शक्तीवरील ई-वाहनांना प्रोत्साहन म्हणून त्यांच्या खरेदीसाठी माफक व्याजदरात बँकेचे कर्ज उपलब्ध होईल. छोट्या व मध्यम उद्योगांना वस्तू व सेवा कर (जीएसटी) माफीच्या मर्यादेत वाढ, व्यक्तिगत करदात्यांना करमुक्त उत्पन्न मर्यादेत १० लाखांपर्यंत वाढ असे काही निर्णय अपेक्षित आहेत. यातून लोकांच्या क्रयशक्तीला, पर्यायाने अर्थव्यवस्थेत मागणी उपभोगालाच चालना मिळणे अपेक्षित आहे.

घराची सबसिडी कायम राहणार?
गृहकर्जाची मुद्दल रक्कम आणि व्याजावर कर कपात वाढवून, ज्यांचे घर घेण्याचे स्वप्न अद्याप अपूर्ण आहे अशा लोकांना मदत केली जाऊ शकते. तसेच प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत लोकांना परवडणारे घर खरेदी करण्यासाठी सरकारकडून अनुदान उपलब्ध आहे. ही सबसिडी योजना डिसेंबर २०२४ मध्ये संपत आहे. रिअल इस्टेट क्षेत्र डिसेंबर २०२५ पर्यंत एक वर्ष वाढवण्याची मागणी करत आहे. याला मुदतवाढ मिळू शकते.

पूर्ण अर्थसंकल्प मांडता येत नाही : मोदी
सार्वत्रिक निवडणुका जवळ आल्या असताना पूर्ण अर्थसंकल्प ठेवला जात नाही, आम्हीही तीच परंपरा पाळू आणि नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर पूर्ण अर्थसंकल्प घेऊन येऊ. यावेळी देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन उद्या आपल्या सर्वांसमोर मार्गदर्शक तत्त्वांसह अर्थसंकल्प सादर करतील. देश प्रगतीची नवीन शिखरे पार करत सतत पुढे जात असल्याचा मला विश्वास आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR