जालना : प्रतिनिधी
उन्हाची तीव्रता वाढत चालली आहे. यामुळे धरण, तलाव यासोबतच नदीतील पाणी देखील आटू लागले आहे. दरम्यान जालन्यातून वाहत असलेल्या गोदावरी नदीतील पाणी आटले आहे. यामुळे परिसरातील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत असून आता यामुळे भीषण चित्र पाहावयास मिळाले आहे. नदीतील पाणी आटल्याने नदीतील माशांचा मृत्यू झाल्याचे पाहण्यास मिळत आहे.
उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. वाढत्या उन्हामुळे पाणी पातळीत प्रचंड घट होत आहे. नदी, धरणे देखील कोरडी पडत आहेत. तर जालन्यातील पाथरवाला बुद्रुक येथील गोदावरी नदीवरील निम्न उच्च पाणीपातळी बंधा-यातील पाणी आटल्याने नदीपात्रात मृत माशांचा खच पाहायला मिळतोय. मृत मासे नदीकाठावर मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत. गोदावरी निम्न उच्च पाणीपातळी बंधा-यातील पाणी आटल्याने मासे पाण्याअभावी तडफडून मृत पावत आहेत.