27.9 C
Latur
Wednesday, November 6, 2024
Homeमहाराष्ट्रगोपाळ शेट्टींची माघार

गोपाळ शेट्टींची माघार

मुंबई : प्रतिनिधी
गोपाळ शेट्टी यांचे बंड अखेर शमले असून त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची समजूत काढली आणि ते यात यशस्वी ठरले आहेत. दरम्यान, मुंबईतील बोरिवली विधानसभा मतदारसंघात महायुतीत एक मोठे बंड पुकारण्यात आले होते. मात्र, यावर तोडगा काढण्यात अखेर यश आले आहे. भाजपमध्ये बंडखोरी करत उमेदवारी अर्ज भरलेल्या गोपाळ शेट्टी यांनी अखेर आपला निर्णय बदलला आहे. गोपाळ शेट्टींनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला.

उमेदवारी अर्ज मागे घेतल्याच्या निर्णयानंतर गोपाळ शेट्टी यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना गोपाळ शेट्टी म्हणाले की हा निर्णय घेताना फार वेदना झाल्या, पण पक्षश्रेष्ठींपर्यंत काही गोष्टी पोहोचवण्यासाठी हे करावे लागले असेही ते म्हणाले.

माझ्या मागण्या काहीच नव्हत्या, प्रक्रियेत गोंधळ झाल्याने हे सर्व करावं लागलं होतं. पक्ष नेतृत्वापर्यंत ही भावना पोहोचली असेल असे मी समजतो. मी एक पक्षाचा जबाबदार कार्यकर्ता आहे, बाहेरील उमेदवार कुठेच कोणी आणूच नये, नेऊच नये अशा मताचा मी नाही, चांगल्या उमेदवाराचा उपयोग पक्षहित आणि लोकहितासाठी केलाच पाहिजे.

परंतु बोरिवलीत हे वारंवार होत होते आणि लोकांची नाराजी माझ्यापर्यंत पोहोचत होती. ती नाराजी पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहोचावी. हा निर्णय घेताना मला खूप वेदना झाल्या. ३३ वर्षांच्या कार्यकाळात जेवढी माझी प्रसिद्धी केली नाही, तेवढी या एका मुद्यावर मीडियाने माझी प्रसिद्धी केली. हे मला बरोबर वाटत नाही पण कधीकधी काही निर्णय घ्यावे लागतात. लोकशाहीच्या हितासाठी मी तो निर्णय घेतलेला. यासाठी मला काही तोटा सहन करावा लागला तरी चालेल. पक्षाने मला खूप मोठे केले.

मी समाजातल्या लोकांना आवाहान करेन, तुमच्यासाठी जी लढाई होती ती मी लढली. ही लढाई कुठपर्यंत नेणं अपेक्षित होतं, याची शिकवण मला लोकांनी दिली आहे. कुठे थांबायला हवं त्याचं मार्गदर्शन हेही लोकांनी दिली. त्याचं नीटपणे उपयोग मी केला आहे, असे मला वाटते. या प्रवासात कळत-नकळत माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर त्या लोकांनी माफ कराव्या, इतकंच मला म्हणायचं आहे, असे गोपाळ शेट्टी म्हणाले.

बंडखोरी का केली होती?
लोकसभेवेळी गोपाळ शेट्टी यांचा पत्ता कट करत पीयूष गोयल यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यावेळी गोपाळ शेट्टी यांना राजकीय पुनर्वसनाचा शब्दही देण्यात आला होता. मात्र, विधानसभेत भाजपने सरचिटणीस संजय उपाध्याय यांना उमेदवारी दिली. त्यामुळे गोपाळ शेट्टी यांनी बंड करत उमेदवारी अर्ज दाखल केला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR