लातूर : प्रतिनिधी
लाडक्या गणरायाच्या आगमनाने भक्तिमय झालेल्या वातावरणात आता माहेशवाशीण म्हणून येणा-या गौराईच्या स्वागताची गेल्या काही दिवसांपासून लगबग सुरु होती. भाद्रपद शुद्ध अनुराधा नक्षत्रावर दि. १७ सप्टेंबर रोजी गौरी आवाहन, ज्येष्ठा नक्षत्रावर दि. १८ सप्टेंबर रोजी गौरी पुजन तर मुळ नक्षत्रावर दि. १९ सप्टेंबर रोजी गौरी विसर्जन होणार आहे. त्यामुळे पुढील तीन दिवस घरांमध्ये महालक्ष्मीच्या पूजनाचा आणि पारंपारीक उत्सवाचा जागर रंगणार आहे. असे असले तरी महालक्ष्मीच्या गोडधोड फराळाला महागाईची किनार असल्यामुळे भक्तांनी हात आखडता घेतल्याचे दिसून आले.
गौराई म्हणजे माहेरवाशीण, अशी भावना असल्याने तिच्या आगमनाला घरातील मुली, महिलांसाठी विशेष महत्व असते. गौराईच्या स्वागातासाठी घराची स्वच्छता करुन आकर्षक सजावट केली जाते. विविध प्रकारच्या फुलांनी आणि रांगोळ्यांनी उबंरा सजवला जातो. गौराईची स्थापना केल्यानंतर विधिवत पुजा, आरती आणि नैवेद्य अर्पण केला जातो. गौरी पुजनाच्या दिवशी घराघरांत विविध पारंपारिक पदार्थांचा नैवेद्य तयार केला जातो. महालक्ष्मीच्या आगमनाने घरात सुख, समृद्धी, आरोग्य आणि समाधान नांदावे, अशी श्रद्धा आहे. त्यामुळे हा उत्सव केवळ धार्मिक विधीपूरता मर्यादित न राहाता कुटुंबातील आपुलकी आणि परंपरांचा उत्सव ठरतो.
महालक्ष्मीच्या आगमानाची जोरदार तयारी सर्वत्र होती. तशीच तयारी महालक्ष्मीच्या गोडधोड फराळाची दिसून येते. बाजारात फराळाची रेलचेल मोठ्या प्रमाणात होती. शहरातील मिठाईच्या दूकानांमध्ये ५० हून अधिक प्रकारच्या फराळांची मोठ्या प्रमााणात विक्री गुरुवारी सुरु होती. शंकरपाळी, बुंदीलाडु, गुलाबजामून, डिंकलाडू, बालूशाही, जिलेबी, मैसूरपाक, पेढा, बर्फी, करंजी, काजूकतली हे गोड पदार्थ तसचे शेव, फरसान, चूरमु-यांचा खमंग चिवढा आदी पदार्थांची मोठ्या प्रमाणात विक्री झाली. यंदा साखरेसह सर्वच वाणांचे भाव वाढल्यामुळे महालक्ष्मीचा फराळही महागल्याचे मिठाईवाले सय्यद यांनी सांगीतले.
















