23.9 C
Latur
Saturday, July 27, 2024
Homeमहाराष्ट्रग्रंथ दालनाला अल्प प्रतिसाद

ग्रंथ दालनाला अल्प प्रतिसाद

पुणे, प्रतिनिधी

नुकत्याच अमळनेर येथे पार पडलेल्या ९७ व्या अखिल भारतीय मराठी संमेलनाला मिळालेल्या एकूणच प्रतिसादाबद्दल चर्चा रंगत आहे. प्रथेप्रमाणे संमेलनात ग्रंथ दालनात विक्रीसाठी अनेक प्रकाशकांनी पुस्तके आणली होती. प्रत्यक्षात अल्पशा प्रतिसादामुळे त्यांच्या पदरात निराशा पडली असल्याचे स्पष्ट झाले आहे.

याबाबत अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाच्या वतीने संमेलनाचे स्वागताध्यक्ष आणि मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे नुकसानभरपाई मिळण्याबाबत निवेदन दिले आहे. त्यात मुख्यत्वे पुस्तक प्रदर्शनामध्ये स्टॉलसाठी जी रक्कम घेण्यात आली ती परत मिळावी अशी मागणी करण्यात आली आहे. याबाबतच्या निवेदनात म्हटले आहे की, मुळात पुस्तक प्रदर्शन हे मुख्य संमेलन स्थळापासून दूर होते. त्याचा परिणाम हा पुस्तक विक्रीवर झाला आहे तसेच पुस्तक प्रदर्शनात स्टॉलची संख्या २५० पेक्षा अधिक होती. त्यातच संमेलनासाठी रसिकांची अपेक्षित प्रमाणात गर्दी झाली नाही. आणि संमेलनासाठी जे रसिक आले त्यातील निवडक पुस्तक स्टॉलवर आले.

पुस्तक खरेदीसाठी जे पोषक वातावरण असणे अपेक्षित असते तसे दिसले नाही. त्यामुळे पुस्तकविक्रीचे प्रमाण देखील अत्यल्प राहिले. त्यामुळे प्रकाशकांचा पुस्तक आणण्या आणि नेण्यासाठी तसेच अन्य खर्च झाला तो देखील भरून निघाला नाही. अशी स्थिती प्रत्येक संमेलनात होत नाही पण या संमेलनात हे घडले आहे. याची दखल घेऊन स्टॉल भाडे रक्कम परत मिळावी, अशी मागणी प्रकाशक संघाचे अध्यक्ष राजीव बर्वे यांनी केली आहे. या मागणीचे निवेदन महामंडळ पदाधिकारी यांना देण्यात आले आहे.

याखेरीज संमेलनाच्या सांगता कार्यक्रमाला आणि अन्य काही कार्यक्रमांना देखील अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही अशी चर्चा सुरू होती. पुढील वर्षीचे ९८ वे साहित्य संमेलन कोठे होणार याबाबत अद्याप काही ठरले नाही. पण त्यासाठीचे प्रस्ताव देण्यासाठी येत्या दि. ३१ मार्चअखेर मुदत देण्यात आली आहे. मात्र आगामी काळातील संमेलनाच्या आयोजकांना वरील विषयाची नोंद घ्यावी लागणार आहे, असा सूर निघत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR