32.6 C
Latur
Monday, February 26, 2024
Homeमहाराष्ट्र‘भगवं वादळ’ दिल्लीच्या तख्तावर आदळणार

‘भगवं वादळ’ दिल्लीच्या तख्तावर आदळणार

मुंबई : भगवं वादळ दिल्लीच्या तख्तावर आदळणार आहे आणि हुकूमशाहीची चिरफाड करणार, असे म्हणत शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. दत्ता घोर्डे पैठण, वैजापूरचे डॉ. राजेंद्र डोंगरे, संभाजीनगरचे बालरोगतज्ज्ञ डॉ. शोएब हाश्मी यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी आज ‘मातोश्री’वर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना ठाकरे गटात पक्षप्रवेश केला आहे. मंगळवारी ‘मातोश्री’वर या सर्वांचा पक्षप्रवेश पार पडला, यावेळी उद्धव ठाकरे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली.

यावेळी ते म्हणाले की, गेले चार दिवस मी कोकण किनारपट्टी भागात कुटुंब संवादासाठी फिरत होतो. कोकण किनारपट्टीवर दौ-यावर होतो. कोरोना काळात राबवलेल्या ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ यानुसार मी माझ्या कुटुंबासोबत संवाद साधत होतो. माझं कुटुंब माझ्यासोबत आहे का, हे मी पाहतो आहे. महाराष्ट्र दौरा करून माझे कुटुंब माझ्यासोबत आहे का हे मला जाणून घ्यायचे आहे. महाराष्ट्रच देशाची दिशा ठरवणार असल्याचेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

‘मन की बात’ पेक्षा ‘जन की बात’ वेगळी
भगवं वादळ दिल्लीला आदळणार, हे भगवं वादळ हुकूमशाहीची चिरफाड करणार आहे. हुकूमशाहीला पर्याय द्यायचा नसतो. हुकूमशाही उखडून फेकून द्यायची असते. ‘मन की बात’ पेक्षा ‘जन की बात’ वेगळी आहे. जनतेची संकटं वेगळीच आहेत. गेल्या १० वर्षांतील भाजपाचा भोंगळ कारभार उघडा पडला आहे.

संतांच्या भूमीत गद्दारीला थारा नाही
अनेक ठिकाणी गावागावांत योजनाच पोहोचलेल्या नाहीत. हा भोंगळ कारभार संपवण्यासाठी सर्वजण शिवसेनेसोबत येत आहेत. महाराष्ट्र आता यापुढे देशाची दिशा ठरवणार आहे, हुकूमशाहीला गाडणार आहे. मराठवाडा संतांची भूमी आहे, संतांच्या भूमीत गद्दारीला थारा नसतो, असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR