22.4 C
Latur
Sunday, January 12, 2025
Homeसंपादकीय विशेषग्रामीण स्त्रीच्या व्यथा-वेदनांचे चित्रण ‘फुटकं डोरलं’

ग्रामीण स्त्रीच्या व्यथा-वेदनांचे चित्रण ‘फुटकं डोरलं’

सेलू (जि. परभणी) येथील सेवा-निवृत्त शिक्षक भगवान कुलकर्णी यांचा ‘फुटकं डोरलं’ हा कथासंग्रह नुकताच अनघा प्रकाशन, ठाणे यांनी राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या अनुदानातून प्रकाशित केला असून यात एकूण तेवीस ग्रामीण कथा आहेत. या सर्वच कथा गाव-खेडे आणि तेथील कष्टकरी स्त्री-पुरुषांच्या जगण्यातील संघर्ष थेटपणे चित्रित करणा-या असून स्वत: लेखकांचा संपूर्ण सेवाकाळ ग्रामीण परिसरात व्यतीत झालेला असल्यामुळे त्यांची नाळ गाव- खेडे, तेथील माणसे, तेथील रूढी, परंपरा, गाव संस्कृती, शिवार इत्यादींशी रुजलेली आहे,

याचा सुखद प्रत्यय या कथांचे वाचन करताना येतो आणि त्यामुळे ही कथा मनाला स्पर्शून जाते. आजही स्त्री-पुरुष समानता, त्यांचे अधिकार आणि हक्क वगैरे गोष्टी गाव-खेड्यांपासून काही मैल अंतरावर आहेत आणि गाव-खेड्यातील स्त्री म्हणजे कसलेही ‘स्वातंत्र्य’ नसलेली नि सदैव कष्टाला जुंपलेली केवळ एक व्यक्ती आहे, असाच समज सर्वत्र रूढ आहे. या पारंपरिक भावनेतूनच त्यांचे मानसिक, शारीरिक शोषण होत राहते आणि त्याही निमूटपणे अन्याय-अत्याचार सहन करत राहतात. देवभोळेपणा, अंधश्रद्धा, पारंपरिक विचारांचा पगडा, पुरुषी वर्चस्व, अज्ञान, शिक्षणाचा अभाव आदी कारणांमुळे होणा-या शोषणाच्या अनेकांगी त-हा या कथांतून अगदी रसरशीतपणे शब्दबद्ध झाल्या आहेत.

भाव-भावकीच्या भांडणात स्वत:चा पती गमावून विधवा झालेल्या पारूच्या आयुष्याची परवड ‘मेणावरचं कुखू’ कथेत येते; तर गरिबीमुळे घरच्यांनी अगदी विजोड नवरा करून दिल्यानंतर आत्महत्येचा मार्ग स्वीकारणारी ‘फुटकं डोरलं’ कथेतील शांती मनाला चटका लावून जाते. मूल- प्राप्तीसाठी देवाला केलेला नवस फेडण्यासाठी राधाच्या संसाराची उडणारी दाणादाण ‘कंदुरी’कथेत रेखाटली आहे; तर पाऊस झडीमुळे उपासमार होऊन जगणं कठीण झालेली मधुरा ‘झडगं’ कथेत रंगवली आहे. दोन मुले असूनही भाकरीला मौताज झालेल्या सुभाईची कहाणी ‘सरवा’ कथेत सांगितली आहे; तर नवरा असूनही पतीसुखापासून वंचित असलेल्या मंगलची दर्दभरी कहाणी ‘सजा’ कथेत उमटली आहे. पुरुषी वर्चस्वाच्या रेट्याखाली वांग्यासमान होरपळून निघालेली उषा ‘होरपळलेलं वांगं’ कथेत रेखाटली आहे; तर स्वत:च्या पोटच्या मुलाकडून झालेली परवड कथन करणारी ‘पायरीचा दगड’ ही कथा आहे. याशिवाय ग्रामीण परिसरातील जनमानसाच्या मनावर अधिराज्य गाजवणा-या अंधश्रद्धांवर झोत टाकणा-या ‘आई माय’ आणि ‘हिरवी मिर्ची’ या दोन कथाही वाचनीय आहेत.

थोडक्यात भगवान कुलकर्णी लिखित ‘फुटकं डोरलं’
मधील कथा ग्रामीण स्त्रियांच्या जीवनातील व्यथा-वेदना उजागर करणा-या असून बोलीभाषेतील नेमक्या संवादातून आणि काही निवडक प्रसंगांद्वारे लेखकाने त्या शब्दबद्ध केल्या आहेत. त्यामुळे या कथा मनाला स्पर्शून जातात आणि सोबतच वाचकमन अस्वस्थ करतात, हे नक्की! मात्र असे असले तरी दोन उणिवा नोंदवणे क्रमप्राप्त आहे. ‘फोटो’ आणि ‘कुलूपाची चाबी’ या कथा मात्र पूर्णत: फसल्या असून त्यांचे स्वरूप आठवणीपर वृत्तांकनाचे झाले आहे. आणि दुसरी बाब म्हणजे संग्रहातील मुद्रणदोष टाळायला हवे होते.असो. मलपृष्ठावर ज्येष्ठ समीक्षक डॉ. वासुदेव मुलाटे म्हणतात त्याप्रमाणे ‘या संग्रहातील कथा ग्रामीण स्त्रियांच्या जीवनातील दंतूर व्यथा-वेदना करणा-या आहेत’. हेच लेखक भगवान कुलकर्णी यांच्या लेखणीचे यश आहे.
फुटकं डोरलं – (कथा)
लेखक – भगवान कुलकर्णी
प्रकाशक – अनघा प्रकाशन, ठाणे.
(मो.९४०४४ ८०५२४)
पृष्ठे – १२८, मूल्य – ६४ रु.
मुखपृष्ठ – महेश कोळी

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR