लातूर : प्रतिनिधी
ग्रीन लातूर वृक्ष टीम सदस्यांनी मुख्य रस्त्यावरील तहसील कार्यालय समोरुन लोकमान्य टिळक चौकपर्यंतचे संपूर्ण दुभाजक स्वच्छ करुन त्या दुभाजकातून अंदाजे दोन गाड्या केरकचरा बाहेर काढला. यामध्ये प्रामुख्याने दारुच्या बाटल्या, दुकानातील शिल्लक भंगार साहित्य, हॉटेलमधील शिल्लक अन्नधान्य, फळ दुकानांमधील कचरा, प्लास्टिकची आवरणे, प्लास्टिक पिशव्या इत्यादी साहित्यानी दुभाजक भरलेले होते.
यासोबतच ग्रीन लातूर वृक्ष टीम सदस्यांनी दुभाजकातील झाडांना आळे केले, झाडांच्या छाटण्या केल्या, झाडांना आकार दिला. दुभाजक म्हणजे कचराकुंडी हे समीकरण लातूर शहरात जवळपास सर्वमान्य झालेले आहे. कचरा आणायचा झाडांभोवती टाकायचा, दुभाजकात टाकून द्यायचा. दुभाजक कच-याने भरभरुन, ओसंडून जात आहेत, त्यातून दुर्गंधी येत आहे. ग्रीन लातूर वृक्ष टीमचे सदस्य अखंडपणे अविरतपणे नियमितपणे महिन्यातून दोन-तीन वेळा शहरातील दुभाजक स्वच्छ करत असतात, मोठ्या प्रमाणावर घाण, मोठा केरकचरा त्यातून बाहेर काढत असतात.
ग्रीन लातूर वृक्ष टीमच्या माध्यमातून लातूर शहराच्या नागरिकांना आवाहन करण्यात येते की घरामध्ये निर्माण झालेल्या कचरा कृपया दुभाजकात टाकू नका, आपलं शहर स्वच्छ, सुंदर, हरित, समृद्ध, आरोग्यदायी ठेवण्याकरिता मदत करा. शहरात कच-याचे व्यवस्थापन योग्य रीतीने होत नसल्याने घरामध्ये दुकानदाराकडे जमा झालेल्या कचरा योग्य वेळी नियमितपणे उचलला जात नसल्यामुळे सगळीकडे कचरा साठलेला दिसून येत आहे प्रशासनाने यावरती अग्रक्रमाने भूमिका घेऊ शहर स्वच्छ करावे अशी मागणी ग्रीन लातूर वृक्ष टीमच्या वतीने करण्यात येत आहे. आजच्या हा स्वच्छता उपक्रम पूर्ण करण्याकरिता ग्रीन लातूर वृक्ष टीमच्या १५ सदस्यांनी सहभाग नोंदवला.