इंदापूर : प्रतिनिधी
बघतोच तुला, बघून घेतो. स्वाभिमानाला काय खपत नाही. वस्तू चोरली, रंग बदलला तरी चोरी काही लपत नाही. स्वार्थासाठी बाप बदलला तर जनतेला पटत नाही. घड्याळ जरी चोरले तुम्ही तरी वेळ मात्र आमचीच आहे, अशी टीका खासदार अमोल कोल्हे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर केली.
दरम्यान, सराटी (ता. इंदापूर) येथे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या शिवस्वराज्य यात्रेत ते बोलत होते. जॅकेट घाला नाहीतर योजना काढा. हवा फक्त पवार साहेबांची आहे. इंदापूर विधानसभा मतदारसंघामध्ये शरदचंद्र पवार यांच्या पाठीशी उभा राहून तुतारी वाजवणारा माणूस दिसला पाहिजे, असे मत खासदार अमोल कोल्हे यांनी व्यक्त केले.
जोपर्यंत मुंबईचे सरकार यांच्या हातून जात नाही, तोपर्यंत ख-या अर्थाने भारतीय जनता पक्षाचा देशात पराभव होणार नाही. म्हणून उद्याच्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजपला सत्तेतून दूर करण्यासाठी दिल्लीच्या सरकारला शेवटचा धक्का मारण्यासाठी आपल्या विधानसभेमध्ये पुन्हा एकदा तुतारी वाजवायची आहे असे प्रतिपादन (दि. ११) शिवस्वराज्य यात्रा इंदापूर तालुक्यातील सराटी येथे आल्यानंतर जिजामाता विद्यालय मैदानावर आयोजित जाहीर सभेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले.