30.4 C
Latur
Thursday, May 8, 2025
Homeमहाराष्ट्रघोडबंदर किल्ल्यावरील भगवा ध्वज जीर्ण अवस्थेत

घोडबंदर किल्ल्यावरील भगवा ध्वज जीर्ण अवस्थेत

मुंबई : ऐतिहासिक आणि सांस्कृतिक अस्मितेचे प्रतीक असलेला घोडबंदर किल्ला पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे. या किल्ल्यावर उभारण्यात आलेला भव्य भगवा ध्वज सध्या पूर्णपणे जीर्ण आणि फाटलेल्या अवस्थेत असल्याचे समोर आले आहे. केवळ एका वर्षात हा ध्वज झिजल्यामुळे स्थानिक नागरिकांत तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांत संतापाची भावना उसळली आहे.

गेल्या वर्षी परिवहन मंत्री आणि आमदार प्रताप सरनाईक यांच्या पुढाकाराने घोडबंदर किल्ल्यावर उभारण्यात आलेला भगवा ध्वज राज्यभरातील सर्वांत मोठ्या ध्वजांपैकी एक होता. हा ध्वज केवळ एक प्रतीक नव्हता, तर मराठी अस्मिता, सांस्कृतिक गौरव आणि इतिहासाचे प्रतीक म्हणून त्याकडे पाहिले जात होते. मात्र सध्या तो ध्वज जीर्ण झाल्याने त्याचे अस्तित्वच अपमानित झाल्यासारखे वाटत असल्याचे मत स्थानिकांनी व्यक्त केले आहे.

मनसेचा आक्रमक पवित्रा
या परिस्थितीवर लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मीरा-भाईंदर शहर शाखेने मनपा प्रशासनाला आधीच पत्राद्वारे ४८ तासांची मुदत देऊन नव्या ध्वजाची व्यवस्था करण्याची विनंती केली होती. परंतु मनपाकडून कोणतीही ठोस कारवाई झाली नाही. या निष्क्रियतेमुळे संतप्त झालेल्या मनसेने आज महापालिकेच्या कार्यालयावर धडक दिली.

शहरप्रमुख संदीप राणे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मनपा अधिका-यांना स्वत:च्या खर्चाने आणलेला नवा भगवा ध्वज सुपुर्द केला. यासोबतच, २४ तासांच्या आत हा ध्वज घोडबंदर किल्ल्यावर फडकवला गेला नाही, तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे.

उत्तरदायी अधिका-यांना काळे फासण्याचा इशारा
मनसेने यावेळी स्पष्टपणे सांगितले की, जर वेळेत कृती झाली नाही, तर मनपा प्रशासनातील उत्तरदायी अधिका-यांच्या निष्क्रियतेविरोधात काळे फासण्याचा निर्णय घेतला जाईल. हे आंदोलन केवळ एका ध्वजापुरते मर्यादित नाही, तर मराठी अस्मितेच्या रक्षणासाठी आवश्यक असल्याचे मनसे पदाधिका-यांचे म्हणणे आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR