नागपूर : उपराजधानी नागपूरमध्ये मानवतेला लाज वाटावी असा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका वासनांध व्यक्तीने चक्क घोडीसोबत अनैसर्गिक कृत्य केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घृणास्पद कृत्याचा व्हीडीओ नागपूरमध्ये सोशल मीडियावर वायरल झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी गिट्टीखदान पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. नागपूर पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
या प्रकरणातील आरोपीचे नाव सुंदर खोब्रागडे असे आहे. ही घटना टीव्ही टॉवरजवळील डिस्ट्रिक्ट इक्वेस्ट्रीअन असोसिएशनच्या हॉर्स रायडिंग अकादमीत १७ मे रोजी घडली. या प्रकरणाचा सीसीटीव्ही व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खोब्रागडे हा चोरीच्या उद्देशाने अकादमीत घुसला होता. तेथे असलेल्या १७ घोड्यांपैकी एका घोड्याच्या पिल्लाजवळ जाऊन त्याने अनैसर्गिक कृत्य केले. यावेळी त्याने अकादमीतून लोखंडी अँगलही चोरल्याचे समोर आले आहे.
अकादमीच्या सुरक्षारक्षकाला आरोपीचे संशयास्पद वर्तन लक्षात आल्यानंतर त्याने त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, खोब्रागडे घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाला. सुरक्षारक्षकाने तातडीने अकादमीच्या मालकाला याबाबत माहिती दिली. त्यानंतर मालकाने गिट्टीखदान पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
पोलिसांनी तात्काळ गुन्हा नोंदवून आरोपीचा शोध सुरू केला आहे.
या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. पशुप्रेमी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी या कृत्याचा तीव्र निषेध केला असून, आरोपीला कठोर शासनाची मागणी केली आहे. पोलिसांनी व्हीडीओ पुराव्याच्या आधारे तपास तीव्र केला असून, लवकरच आरोपीला अटक होण्याची शक्यता आहे. या घटनेने समाजातील नैतिक अध:पतनाचे गंभीर चित्र समोर आणले आहे.